‘मी टू’ मोहिमेमुळे कलाक्षेत्रातील काही जणी हक्काने त्यांच्याबरोबर घडलेल्या गैरवर्तनाबाबत धैर्य एकवटून बोलू लागल्या होत्या. पण असेही काही जण आहेत जे याबद्दल खुलेपणाने बोलणं अजूनही टाळतात. याबाबतच टीव्ही अभिनेत्री चाहत खन्नाने धक्कादायक खुलासा केला आहे. कास्टिंग काऊचमुळे चित्रपटांपासून दूर राहिल्याचं चाहतने या मुलाखतीत सांगितलं.
‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत चाहतने चित्रपटांपासून दूर राहण्यामागचं कारण सांगितलं. ”कास्टिंग डायरेक्टरसुद्धा अशा घटनांमध्ये सहभागी असतात. मात्र कोणीच याची कबुली देणार नाही. कास्टिंग काऊच खूप मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीत आहे,” असं ती म्हणाली.
याविषयी ‘मी टू’ मोहिमेदरम्यान खुलासा का केला नाही असं विचारलं असता ती पुढे म्हणाली, ”काहीजणींनी चेक घेऊन तोंड बंद ठेवलं आणि ज्यांचा पब्लिसिटी स्टंट होता त्यांना तो कामी आला. फॅशन ट्रेण्डसारखा तो एक काळ होता. बऱ्याच अभिनेत्रींनी तोंड बंद ठेवणंच पसंत केलं.”
‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेतील भूमिकेमुळे चाहत प्रकाशझोतात आली. ती संजय दत्तच्या आगामी ‘प्रस्थानम’ या चित्रपटात झळकणार आहे.