डिसेंबर २०१२ मध्ये घडलेल्या निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणानंतर संतापाची एक लाट देशभरात उसळली होती. आता सात वर्षांनंतर अखेर निर्भयाला न्याय मिळाला. २० मार्च २०२०, सकाळी साडेपाच वाजता ठरलेल्या वेळेवर चारही दोषींना फासावर लटकवण्यात आले. यावर वेगवेगळ्या माध्यमातून सर्वजण प्रतिक्रिया देत आहेत. मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

निर्भयाला उशिरा न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना दिली आहे. ‘महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना दररोज समोर येत असतात. अशा घटना थांबवायच्या असतील तर उशीर करून चालणार नाही. बलात्काराच्या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे. असे केल्याशिवाय या घटना थांबणार नाहीत’ असे सोनाली म्हणाली. 

‘निर्भया प्रकरणात उशीर झाला आहे. इतक्या वर्षांनी न्याय मिळाला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना दररोज समोर येत आहेत. या घटना थांबवायच्या असतील तर इतका उशीर करून चालणार नाही. तात्काळ पीडितेला न्याय मिळाला पाहिजे. बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. असे न झाल्यास अशा घटना थांबणार नाहीत’ अस मत तिने व्यक्त केले. पुढे ती म्हणाली की, इतक्या वर्षांनी निर्भयाला न्याय मिळाला. मात्र, निर्भयाची आई आणि तिचे कुटुंब अनेक त्रासातून गेलेले आहेत. एवढा त्रास कोणालाही होऊ नये असे माझे मत आहे. बलात्कार प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे.