चित्रपटाच्या जगात पंचवीस वर्षांचा कालखंड खूपच मोठा. विशेषत: ‘नायिका’ म्हणून कारकिर्द घडवताना ‘अभिनेत्री’साठी तर जास्तच अवघड. चित्रपटाचे जग एका बाजूने पंचतारांकित वा ग्लॅमरस वाटत असले तरी काही गोष्टी चित्रपटाचे यशापयश, बदलता चित्रपट व त्याचा प्रेक्षक वर्ग, आपला फिटनेस व सतत येणार्‍या नवतारकांमध्ये स्वतःला हरवू न देणे यावर अवलंबून असतात.

सोनाली कुलकर्णी यामध्ये यशस्वी ठरलीय व आज तब्बल पंचवीस वर्षांच्या चौफेर व अष्टपैलू कारकिर्दीनंतरही ती ‘आजची नायिका’ म्हणून वाटचाल करतेय हे विशेषच कौतुकास्पद. गिरीश कर्नाड दिग्दर्शित ‘चेलुवी’ ( फुलाचे नाव) हा कन्नड चित्रपट तिचा पहिला. तो १९९२ चा . मराठीत तिचा पहिलाच चित्रपट डॉ. जब्बार पटेल यांचा ‘मुक्ता’. यात तिची शीर्षक भूमिका. जब्बार पटेल यांचा चित्रपट म्हणजे वेगळेच वातावरण निर्माण होई. त्यांच्याच ‘जैत रे जैत’ व ‘उंबरठा’मधील स्मिता पाटील विशेष लक्षवेधक ठरल्याने तर ‘मुक्तामधील ही सोनाली कुलकर्णी कोण’ असा त्या काळात टीकोजीरावांचा प्रश्न होता. १९९५ च्या जानेवारीत मुंबईतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय पॅनोरमाचे उदघाटन ‘मुक्ता’ चित्रपटाने झाले. तेव्हा या शोपूर्वी न्यू एक्सलसियर थिएटरबाहेर सोनालीची झालेली पहिलीच भेट तिच्या विलक्षण आत्मविश्वासाचा प्रत्यय देणारी होती. याच भूमिकेसाठी सोनालीने राज्य शासनाकडून सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला तेव्हाची एक विशेष आठवण आहेच. धोबीतलावच्या रंगभवन येथील हा सोहळा रात्री उशिरा संपताच सोनाली आपल्या नातेवाईकांसोबत सेन्ट्रल रेल्वेच्या सेकंड क्लासच्या डब्यातून उपनगरात जायला निघाली. हा क्षण एका फोटोग्राफरला विशेष वाटला. त्यात सोनालीची नम्रता त्याला जाणवली. हा फोटो ‘सांज लोकसत्ता’ने पहिल्याच पानावर प्रसिद्ध केला. सोनाली मराठी चित्रपटात भूमिका करु लागली त्या दिवसात मराठीत ‘माहेर’छाप सोशिक चित्रपट खूप बनत. पण सोनाली एकाच वेळेस विविध भाषांतील चित्रपटातून भूमिका करणारी (तरीही कधीही फिल्मी न झालेली), भरपूर वाचन करणारी (मराठीसह इतर भाषांतीलही साहित्य वाचणारी), विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाना हजर राहणारी, जागतिक चित्रपट पाहणारी, विविध प्रकारच्या व्यायामातून स्वतःला फिट ठेवणारी, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाना हजर राहणारी व आपले छोटे छोटे अनुभव स्वतःच लिहिणारी अशी विविधस्पर्शी आहे. ती बौद्धिक वाढ व शारीरिक फिटनेस यात विशेष रस घेते हेच यावरून स्पष्ट दिसतेय. म्हणूनच ती ‘कालची नायिका’ झाली नाही. ती सतत ‘आज’ असते. हे कसब वा कौशल्य नाही तर ती सवय व स्वभाव असतो.

तिच्या उत्स्फूर्त लेखनाबाबत सांगायचे तर लोकसत्ताच्या विवा पुरवणीत ‘सोकुल’ लिहिण्याचा तिने मनसोक्त मनमुराद आनंद घेतला. त्याचे पुस्तकही झालेय. अगदी छोटासा अनुभव देखील लिहिण्याचा विषय ठरु शकतो व कसलीही पोझ न घेताही एखादा संदेश अथवा सल्ला देता येतो हे तिच्या लेखनातील वैशिष्ट्य. सोनाली एकसुरी नाही तर विविध स्तरावर वाटचाल करतेय, वाढतेय हे स्पष्ट दिसतेय व म्हणूनच ती ‘आजची नायिका’ म्हणून स्थिर राहिलीय. मराठी, हिंदी, कन्नड भाषेतील चित्रपटांबरोबरच तिने तमिळ, गुजरातीसोबत इंग्लिश आणि इटालियन चित्रपटातूनही अभिनय केलाय. Fuoco su di me हे तिच्या इटालियन चित्रपटाचे नाव. विविध भाषांतील चित्रपटसृष्टीत काम करताना अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्यांची चित्रपट संस्कृती थोडीफार जाणून घेता येते. ती भाषाही काही प्रमाणात समजून शिकता येते.

चित्रपटातून भूमिका करणे म्हणजेच या सेटवरून त्या सेटवर जा, मुहूर्तापासून प्रीमियरपर्यंत हजर रहा एवढंच विश्व नसते. त्या पलिकडे जाऊन बरेच काही असते ते सोनालीला दिसते पण आपण तसे तिच्याकडे पाहात नाही. सोनालीची जडणघडण अशी विस्तृत आहे म्हणूनच ती बदलता काळ, बदलता चित्रपट यासह वाटचाल करीत राहिली व आता सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘गुलाब जाम’साठीही ती तितकीच तजेलदार व उत्साही आहे. हा उत्स्फूर्तपणा तिला अनेक छोट्या गोष्टीतून व त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याने मिळतोय. म्हणूनच तर डॉ. बाबा आमटे यांच्या जीवनावरील चित्रपटात मंदाकिनी आमटे साकारणारीच सोनाली ‘सिंघम’मध्येही पाहताना आश्चर्य वाटत नाही. कारण ती चतुरस्र असल्याची आपल्याला खात्री असते. ‘दिल चाहता हैं’ या युथफूल चित्रपटात ग्लॅमरस तरुणी साकारणारी सोनाली पाऊस लांबल्याने दुष्काळग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या दु:खावरील ‘ग्राभीचा पाऊस’मध्येदेखील असते. तात्पर्य आशयघन चित्रपट व व्यावसायिक चित्रपट याचा समतोल तिने साधलाय. म्हणूनच ती ‘अगं बाई अरेच्चा २’ च्या कॉमेडीतही असते व ‘वासुदेव बळवंत फडके’ या चरित्रपटातही असते.

सनी देओल दिलीप शुक्लाकडे दिग्दर्शन सोपवून ‘चक्र’ नावाचा चित्रपट निर्माण करीत होता. शिल्पा शेट्टी त्यात नायिका तर सोनाली निगेटिव्ह भूमिकेत होती. तो चित्रपट बंद पडला नसता तर सोनालीची मसालेदार मनोरंजक चित्रपटातून आणखीन एक भूमिका दिसली असती. ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोमध्ये ती नाचलीही आणि आपली खासियत वाढवली. असे अनेक नवीन अनुभव तिच्या कारकिर्दीने पंचवीस वर्षे पूर्ण केल्याची जाणीव बाजूला ठेवतात. गेल्याच वर्षी तिने ‘कच्चा लिंबू’सारखा अतिशय ह्रदयद्रावक व पोस्टर बॉईज (मराठीची हिंदीत रिमेक) असा टपोरी चित्रपट असे भिन्न स्वरूपाचे चित्रपट एकाच वेळेस केल्याने तिचे अनुभव विश्व वाढले. कलाकार व व्यक्ती अशा दोन्ही पातळीवर वावरताना अनेक प्रकारच्या अनुभवाला सामोरे जाण्यास हीच भिन्नता उपयोगी पडते.
दिलीप ठाकूर