बॉलीवूडमध्ये मिर्झिया चित्रपटाने पदार्पण करणारा अभिनेता हर्षवर्धन कपूर हा दिलजीत दोसांजवर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चर्चेचा विषय बनला होता. नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात दिलजीत दोसांजला उडता पंजाब चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता विभागातील पुरस्कार देण्यात आला होता. त्यामुळे हर्षवर्धनने त्याची नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर हर्षवर्धनची बहिण आणि बॉलीवूडची स्टाइल दीवा सोनम कपूर हिने आपल्या भावाची पाठराखण केली आहे. यासंबंधी तिने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली.
आपल्या भावाची पाठराखण करताना सोनम म्हणाली की, तो त्या प्रकारचा व्यक्ती नाही. तो एक निरागस, दयाळू आणि सभ्य असा व्यक्ती आहे. केवळ पदार्पणातील पुरस्कावर प्रतिक्रिया दिल्यामुळे तुम्ही त्याची खिल्ली उडवू शकत नाही. तो मनापासून बोलत होता. माझ्या मते, त्याने विषयांतर करून कोणतेही वक्तव्य केलेले नाही. सोनमने भावासोबतच त्याच्या चित्रपटाचीही बाजू घेतली. ती म्हणाली की, बॉक्स ऑफिवसर चित्रपट चालला नाही याचा अर्थ चित्रपटासाठी केलेले सर्व परिश्रम वाया गेले असा त्याचा अर्थ होत नाही. माझा पदार्पणातील साँवरिया हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नव्हता. पण, मला तो चित्रपट केल्याचा अभिमान आहे. तसेच, मिर्झियामध्ये माझ्या भावाने जे काही काम केलेय त्याचाही मला अभिमान आहे. दिलजीत चाहत्यांमध्ये हर्षचाही समावेश आहे. त्याचा आक्षेप तांत्रिक दृष्टिकोनातून होता. आमच्या वडिलांनी (अनिल कपूर) आम्हाला इतरांची प्रशंसा करायला शिकविले आहे. आम्ही अशा वातावरणात वाढलोय जिथे नेहमी दुस-या कलाकाराच्या कामाची प्रशंसा केली जाते. माझा भाऊ किंवा मीसुद्धा चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या कामावरून चिडलेलो नाही.
फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार न मिळाल्याने हर्षवर्धन नाराज झाला होता. हा पुरस्कार ‘उडता पंजाब’ या चित्रपटासाठी दिलजीत दोसांजला दिला गेल्यानेने हर्षवर्धनने नाराजीचा सूर आळवला होता. त्याने ट्विटरवरून आपली नाराजी व्यक्त करत म्हटलेले की,‘मला फिल्मफेअर व्यतिरिक्त इतर सर्व पुरस्कार मिळाले आहेत. काही पुरस्कारांमध्ये ज्युरी पुरस्कारांसंबंधीचे निर्णय घेतात. काही ठिकाणी लोकप्रियतेच्या निकषांवर हे ठरवले जाते. मला नाही ठाऊक या वर्षी त्यांनी हा निर्णय नेमका कसा घेतला आहे. माझ्यामते पदार्पणासाठीचा पुरस्कार हा अगदी नवख्या कलाकारालाच देण्यात यावा. मी खूप कमी चित्रपटांमध्ये काम केले आहे. दुसरीकडून असेही म्हटले जाऊ शकते की, मी १०० इंग्रजी चित्रपट केले आहेत आणि आता मी हिंदी चित्रपट करत आहे. त्यामुळे हे माझे पदार्पणच आहे. तर मग लिओनार्दो दिकेप्रियोने ऑस्कर जिंकल्यानंतर तो बॉलिवूडकडे वळला तर ते त्याचे पदार्पणच असेल. ही गोष्टच मला पटत नाही’, असे ठाम मत हर्षवर्धनने मांडले होते. त्यानंतर आपल्याला फिल्मफेअर पुरस्कार न मिळाल्याचे दुःख पचवण्यास हर्षवर्धनने बराच वेळ घेतला. पण, नंतर स्वतःची चूक उमगल्यानंतर हर्षवर्धनने ट्विट करून दिलजीतची माफी मागितलेली.