लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात दिला. सोनू सूदने कशाचीही पर्वा न करता लोकांना भरभरून मदत केली. त्यामुळे त्याचं कौतुकही झालं आणि त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला? यावर संशयही व्यक्त केला गेला. पण सोनू सूदने एक-दोन नव्हे तर आपल्या तब्बल ८ मालमत्ता गहाण ठेवल्या. त्यातून १० कोटींचं कर्ज घेतलं आणि गरीबांना मदतीचा हात दिल्याची माहिती समोर आली आहे.
सर्व मालमत्ता जुहूतील
लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या अडचणी पाहून अस्वस्थ झालेल्या सोनूने त्याच्या एकूण आठ मालमत्ता गहाण ठेवल्या. त्यातून त्याने १० कोटी रुपये उभे केले आणि लोकांना सढळ हाताने मदत केली. जुहू येथील पॉश आणि हायप्रोफाईल परिसरातील ८ मालमत्ता त्याने गहाण ठेवल्या आहेत.
दोन दुकाने आणि फ्लॅट गहाण ठेवले
मनी कंट्रोल या वेब पोर्टलने याबाबतची माहिती दिली आहे. जुहू येथील दोन दुकाने आणि सहा फ्लॅट त्याने गहाण ठेवले आहेत. ही दोन्ही दुकाने तळमजल्यावर आहेत. तर शिवसागर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत त्याचा फ्लॅट आहे. ही सोसायटी इस्कॉन मंदिराजवळील ए. बी. नायर रोडवर आहे.
पत्नीची मालमत्ताही गहाण ठेवली
या आठ मालमत्ता गहाण ठेवून त्याबदल्यात त्याने बँकेकडून १० कोटीचं कर्ज घेतलं आहे. दस्ताऐवजानुसार त्याने १० कोटींचं कर्ज घेण्यासाठी पाच लाख रुपये नोंदणी शुल्कही भरलं आहे. यातील काही मालमत्ता त्याची पत्नी सोनालीच्या नावावरही आहेत. मात्र, सोनूकडून याबाबतचा अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.