दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या जवळपास आठ दिवसांमध्ये १२० कोटी रुपयांची कमाई केल्याचे म्हटले जाते. आता निर्मात्यांनी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सूर्यवंशी हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाचे हक्क जवळपास १०० कोटी रुपयांना विकले असल्याचे म्हटले जात आहे. बॉक्स ऑफिसवर जादू करणारा हा चित्रपट आता ओटीटी नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ४ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा : शाहरुखची लेक आणि सैफचा मुलगा ‘या’ चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट देशात ३,५०० स्क्रीन्सवर आणि परदेशात १३०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्रात ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थित चित्रपटगृहे सुरु करण्यात आली आहे. तसेच या चित्रपटासोबत हॉलिवूड चित्रपट एटर्नल्स देखील प्रदर्शित झाला होता. पण सूर्यवंशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.

‘सूर्यवंशी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रणवीर सिंह, कतरिना कैफ आणि अजय देवगण अशी तगडी स्टार कास्ट आहे. तसेच अभिनेते गुलशन ग्रोव्हर खलनायकाच्या भूमिकेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत आहे. मात्र करोनामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. अखेर ५ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आणि चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.