दाक्षिणात्य चित्रपसृष्टीसुद्धा गेल्या बऱ्याच वर्षांपासून बॉलिवूडला टक्कर देत आहे. मुख्य म्हणजे देशातील आतापर्यंतचा सर्वात महागडा आणि विक्रमी कमाई करणारा चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच आकारास आला आहे. अशा या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. मुख्य म्हणजे आपल्या मुलाच्या म्हणजेच नागा चैतन्यच्या आगामी ‘रारंदोइ वेदुका चुडम’ Rarandoi Veduka Chudam या चित्रपटामुळे नागार्जुन चर्चेत आला आहे.

नागा चैतन्यच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरने प्रेक्षकांची मनं जिंकायला सुरूवातही केली. त्यासोबत नागा चैतन्यच्या होणाऱ्या पत्नीवरही या ट्रेलरने छाप पाडली असून, नागार्जुन यांच्यासोबत समंथा म्हणजेच नागा चैतन्यच्या होणाऱ्या पत्नीच्या चॅटचा फोटो व्हायरल होत आहे. समंथासोबतच्या चॅटचा एक फोटो नागार्जुन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

नागार्जुन समंथाला ‘कोडला’ असं संबोधतात हे चॅटचा फोटो पाहून लक्षात येत आहे. आपलं अभिनंदन करणाऱ्या नागार्जुन यांना उत्तर देत समंथाने लिहिलंय, ‘मामा….मलाही तो ट्रेलर आवडलाय. त्याचं काम आवडलंय. मला खूप आनंद होतोय..’ समंथा आणि नागार्जुन यांच्यातील हा संवाद पाहता या सेलिब्रिटी कुटुंबातील नात्याचे बंध कसे असतील याचा अंदाज लावता येत आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य याचा प्रेयसी आणि प्रसिद्ध अभिनेत्री समंथा हिच्यासोबत काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हे दोघे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

सोशल मीडिया आणि चाहत्यांच्या वर्तुळात समंथा आणि नागा चैतन्य यांना ‘समचै’ म्हणून ओळखले जाते. यंदाच्या वर्षअखेर टॉलिवूडची ही सर्वाधिक लोकप्रिय जोडी लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जातय. त्यामुळे चाहत्यांनाही त्यांच्या विवाहसोहळ्याचीच उत्सुकता लागून राहिली आहे, असं म्हणायला हरकत नाही.