प्रसिद्ध चित्रपट निर्माते व दिग्दर्शक एसएस राजामौली आणि त्यांचा मुलगा एसएस कार्तिकेय जपानच्या भूकंपातून थोडक्यात बचावल्याचं वृत्त समोर आलं आहे. गुरुवारी २१ मार्च रोजी जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.३ मोजली गेली. एसएस कार्तिकेय यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या स्मार्टवॉचमध्ये भूकंपाचा इशारा दाखवला आणि काही वेळातच ५.३ तीव्रतेचा भूकंप जाणवला.

राजामौली यांच्या मुलाच्या सांगण्यानुसार भूकंप झाला तेव्हा तो आणि आरआरआरची संपूर्ण टीम इमारतीच्या २८ व्या मजल्यावर उपस्थित होती. एसएस कार्तिकेयने ‘एक्स'(ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो शेअर केला आणि लिहिले, “जपानमध्ये धोकादायक भूकंपाचा आम्ही अनुभव घेतला. आम्ही २८ व्या मजल्यावर होतो. जमीन हळूहळू थरथरू लागली. तो भूकंप होता हे समजायला आम्हाला काही क्षण लागले. मी घाबरून ओरडणार होतो, पण आमच्या आजूबाजूच्या सर्व जपानी लोकांना त्याची पर्वा नव्हती. अगदी पावसाळ्यात आपली लोक जितक्या सहजतेने वावरतात तितकी सहज त्यांची प्रतिक्रिया होती.”

आणखी वाचा : पहिला पगार आणि बॉलिवूडमधील स्ट्रगलबद्दल सिद्धार्थ मल्होत्रा प्रथमच बोलला; ‘या’ कामातून मिळालेली ‘इतकी’ रक्कम

जपानच्या हवामान संस्थेने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, जपानच्या पूर्वेकडील इबाराकी येथेयेथील परिसरात ५.३ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. जपानला बऱ्याच काळापासून भूकंपाचे धक्के सतत जाणवत असतात ही बाब सर्वश्रुत आहेच. नवीन वर्षाच्या निमित्ताने म्हणजेच १ जानेवारी २०२४ रोजी जपानमध्ये २१ भूकंपाचे धक्के जाणवले, त्यापैकी एकाची तीव्रता ७.६ इतकी असल्याचे सांगण्यात आले.

एसएस राजामौली यांच्याबद्दल सांगायचे तर ते गेल्या काही दिवसांपासून जपानमध्ये आहेत. चित्रपटाची टीम आणि कुटुंबासह आरआरआरच्या स्क्रीनिंगमध्ये सहभागी होण्यासाठी ते जपानमध्ये गेले होते. राजामौली यांचा हा चित्रपट जपानमध्ये गेल्या ५१३ दिवसांपासून सुरू आहे आणि तेथील लोकांमध्ये याची प्रचंड क्रेझ अनुभवायला मिळत आहे. जेव्हा एसएस राजामौली तेथे आरआरआरच्या स्क्रीनिंगला उपस्थित होते तेव्हा लोकांच्या प्रचंड जमावाने त्यांना घेरले आणि खूप शिट्ट्या वाजवल्या. राजामौली यांनी सर्वांची भेट घेतली. त्यांच्या एका चाहत्याने त्याला शुभेच्छा म्हणून एक हजार ओरिगामी क्रेन भेट दिल्या होत्या.