मराठीमधील वेगळे प्रयोग करणारा आणि अष्टपैलू अभिनेता म्हणून सुबोध भावेला ओळखलं जातं. अगदी मालिक, नाटकांपासून ते चित्रपटांपर्यंत वेगवगेळ्या भूमिकांमध्ये आतापर्यंत सुबोध प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पण नुकताच त्याने पोस्ट केलेला एक फोटो पाहून त्याचे चाहते गोंधळात पडलेत. सुबोध आता अभिनय सोडणार की काय पाहून ते नेमका या पोस्टचा अर्थ काय अशा अनेक चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत.

नक्की पाहा >> Video: ….अन् ठाकरे सरकारमध्ये मंत्री असणारे एकनाथ शिंदे स्टेजवरच अभिनेत्याच्या पाया पडले

झालं असं की, सुबोध भावेने मायक्रोसॉफ्ट या कंपनीच्या ऑफिसमधील एक फोटो पोस्ट केला आहे. सुबोध हा मायक्रोसॉफ्ट कंपनीचा लोगो आणि नाव असलेल्या भिंतसमोर उभा राहून हसताना या फोटोत दिसतोय. मात्र या फोटोहून अधिक चर्चा या फोटोला देण्यात आलेल्या कॅप्शनची आहे. सुबोधने हा फोटो शेअर करताना, “जस्ट जॉइण्ड… मायक्रोसॉफ्ट” अशी कॅप्शन दिलीय. मात्र परदेशात गेल्यानंतरही त्याने मराठी बाणा सोडला नसल्याचं याच फोटोला दिलेल्या कॅफ्शनमधील पुढच्या ओळीत दिसतंय. “आमच्या कडे “विंडोज” बसवून मिळतील,” अशी पुढील ओळ त्याने इमोजीसहीत पोस्ट केलीय.

आता सुबोधने एवढी भन्नाट कॅप्शन दिल्यावर त्यावर कमेंट्सचा पाऊस तर पडणारच. काहींना खरोखरोच सुबोधने मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केल्यासारखं वाटलंय तर काहींनी विंडोज या मराठमोळ्या कॅप्शनवरुन कमेंट केल्यात. अगदी सुबोध अमेरिकेमध्ये स्थायिक झाल्यापासून ते मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांचा बायोपिक सुबोध करणार आहे की काय पर्यंतच्या अनेक शंका त्याच्या या पोस्टवरुन चाहत्यांनी उपस्थित केल्यात. पाहुयात सुबोधचे चाहते काय म्हणतायत.

काहींनी अभिनंदन करत सर तिथे रेफ्रन्स असेल तर रेझ्युमे पाठवू का असा प्रश्न विचारलाय तर काहींनी तुमच्याकडे सर्व काही असताना नोकरी कशाला करायची असा प्रश्न विचारलाय.

काहींनी तुम्ही सत्या नाडेलांना रिप्लेस करताय का असा प्रश्न विचारलाय. तर काहींनी विंडोज बसवल्या तरी त्या नाजूक म्हणजेच सॉफ्ट असणार नाही याची काळजी घेण्याचा मजेदार सल्ला दिलाय. अनेकांनी सिएटलवरुन सिएटलला सेटल झाला म्हणत तो अमेरिकेमध्येच राहणार आहे का असा प्रश्न विचारलाय.

एकाने आता सुबोध भावे सत्या नाडेलाच्या बायोपिकमध्ये दिसणार अशी शंका उपस्थित केलीय. तर अन्य एकाने पुन्हा एकदा खरोखरच सुबोध मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी करणार असं समजून तो एप्रिल फूल बनवत असल्याची कमेंट केलीय.

एकाने मायक्रोसॉफ्टचं नाव बदलून सुबोधच्या लोकप्रिय डायलॉगनुसार ‘एकदम कडक’ असं करावं लागेल अशी कमेंट केलीय. तर अन्य एकाने सॉफ्टवेअर इंजिनिअरवर चित्रपट बनवण्याची सुबोधची ही तयारी सुरु आहे की काय असा प्रश्न विचारलाय.

आता या साऱ्या पोस्ट आणि कमेंटनंतर खरं सांगायचं झाल्यास सुबोध सध्या अश्रूंची झाली फुले या नाटकानिमित्त अमेरिका दौऱ्यावर आहेत. तो सिएटल या अमेरिकेतील शहरात असून तिथे मायक्रोसॉफ्टचं मोठं ऑफिस आहे. याच ऑफिसला सुबोधने भेट दिली तेव्हा त्याने हा फोटो काढल्याचं त्याने फोटोसोबत दिलेल्या हॅशटॅगवरुन स्पष्ट होतंय. पण त्याने दिलेल्या कॅप्शनवरुन अनेकांनी सुतावरुन स्वर्ग गाठल्याचं कमेंट सेक्शनमध्ये दिसून येतंय.