आई-वडील फिल्म इंडस्ट्रीत काम करत असल्याने याच क्षेत्रात करिअर करणारे अनेक स्टार किड्स तुम्ही पाहिले असतील. फक्त बॉलीवूडच नाही तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही अनेक कलाकारांची मुलं आई व वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत याच इंडस्ट्रीत आली. पण एका दिग्गज अभिनेत्याच्या मुलाने मात्र अभिनयात रस असूनही वेगळं करिअर निवडलं.
या सुपरस्टारच्या मुलाला अभिनयापेक्षा अभ्यासात जास्त रस होता, त्यामुळे त्याने अभ्यास करून आयएएस व्हायचं ठरवलं. मुख्य म्हणजे कठोर मेहनत घेऊन त्याने ते स्वप्न पूर्णही केलं. या अधिकाऱ्याचं नाव श्रुतंजय नारायणन आहे. श्रुतंजय यांचे वडील चिन्नी जयंत उर्फ कृष्णमूर्ती नारायणन हे प्रसिद्ध तमिळ अभिनेते आहेत.
सुपरस्टारच्या आयएएस मुलाची गोष्ट
चिन्नी जयंत हे तमिळ चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. १९८० च्या दशकात रजनीकांतच्या अनेक चित्रपटांमध्ये विनोदी अभिनयाने चिन्नी जयंत यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्यांच्या विनोदी भूमिकांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. त्यांना पडद्यावर पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी हास्याची पर्वणी असायची. आपल्या अभिनयाने त्यांनी तमिळ इंडस्ट्रीत स्वतःचा ठसा उमटवला. अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारणाऱ्या चिन्नी जयंत यांचा मुलगा श्रुतंजय नारायणन यांनी चित्रपटांमध्ये जाण्याऐवजी प्रशासकीय सेवेत करिअर करण्याचा निर्णय घेतला. अभिनयाच्या वातावरणात वाढलेल्या श्रुतंजय यांना चित्रपटांमध्ये रस होता, परंतु त्यांनी अभ्यासाला प्राधान्य दिले आणि वेगळी वाट निवडली.
अभ्यासावर केंद्रित केलं लक्ष
चिन्नी जयंत यांचे चिरंजीव श्रुतंजय नारायणन यांनी गिंडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अशोका विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. मग त्यांना एका स्टार्टअपमध्ये काम करण्याची संधी मिळाली, तिथे काम करून त्यांनी अनुभव घेतला. मात्र त्यांचे ध्येय आयएएस अधिकारी व्हायचे होते. यासाठी त्यांनी नोकरी करताना दररोज ४-५ तास अभ्यास सुरू ठेवला. ते रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करून आपला खर्च भागवायचे. त्यांनी वडिलांकडून आर्थिक मदत घेतली नाही. श्रुतंजयनी केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ त्यांना मिळाले.
दुसऱ्या प्रयत्नात झाले IAS
श्रुतंजय यांनी २०१५ मध्ये यूपीएससी परीक्षेत अखिल भारतीय ७५ वा क्रमांक मिळवला. हा त्यांचा दुसरा प्रयत्न होता. सध्या श्रुतंजय नारायणन तामिळनाडूच्या तिरुप्पुर जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत. यापूर्वी ते विल्लुपुरम जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी (विकास) म्हणून कार्यरत होते, त्यावेळी त्यांनी ग्रामीण भागात अनेक विकास योजना राबवल्या.
श्रुतंजय यांची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आयुष्यात काय करायचंय, ते ठरवलं आणि त्यासाठी कठोर परिश्रम घेतले की यश मिळतंच याचं उत्तम उदाहरण श्रुतंजय आहेत. वडील मोठे स्टार असूनही श्रुतंजय यांनी फिल्म इंडस्ट्रीत न येता वेगळी वाट निवडली आणि कठोर परिश्रमाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.