Sumeet Raghvan Reaction On Hindi Language : मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आज (७ जुलै) मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आलं. हिंदी भाषेच्या मुद्यासंदर्भातील जीआर रद्द झाल्यानंतरही हे आंदोलन करण्यात आलं. पाचवीपर्यंत कोणतीही तिसरी भाषा नको यासाठी आझाद मैदानातील या आंदोलनात साहित्यिक, सामाजिक आणि राजकीय पक्षही सहभागी झाले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठी अभिनेता सुमीत राघवननेही हजेरी लावली.
यावेळी सुमीतने हिंदी भाषा सक्तीबद्दलची त्याची भूमिका स्पष्ट केली. माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सुमीतने हिंदी सक्ती नसावी. तसंच महाराष्ट्रात फक्त मराठी भाषाच अनिवार्य असली पाहिजे असं मत व्यक्त केलं. त्याचबरोबर मराठी शाळा, शाळांमधील शिक्षक तसंच मराठी कलाकारांच्या व्यक्त होण्याबद्दलही सुमीतने प्रतिक्रिया दिली.
एबीपीला दिलेल्या मुलाखतात सुमीत म्हणाला, “दोन्ही जीआर सरकारने रद्द केले आहेत. तर पुन्हा एक नवीन समिती स्थापन करण्याची गरज नाही. निर्णय झाला आहे, की तिसऱ्या भाषेची सक्ती करु नये. पण विनाकारण ते पुन्हा एकदा उकरून काढण्यात येत आहे. पाचवीनंतरच हिंदी भाषा अंमलात आणावी. त्याचसाठी आंदोलन सुरू आहे, त्यात बऱ्याच मागण्या आहेत. त्यापैकी महत्त्वाचा मुद्दा आहे, तो हिंदी सक्तीचा.”
यानंतर सुमीत म्हणाला, “कोणत्याच भाषेबद्दल आकस नाही. प्रत्येक भाषेमुळे समाजाचा उद्धारच होतो. पण आपल्या राज्यात मराठी भाषा कुठेतरी डावलली जात आहे. मी स्वत: हिंदी भाषेत काम करणारा नट आहे. हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून मी काम करत आहे, पण हा आमच्या व्यवसायाचा भाग झाला. आमची मुलं मराठी माध्यमात शिक्षण घेत आहेत. याबद्दल आमचा हा विचार होता की, परिसर भाषेत शिक्षण घेतल्याने मुल जास्त प्रगल्भ होतं.”
सुमीत राघवन इन्स्टाग्राम पोस्ट
यानंतर त्याने म्हटलं, “यापेक्षा मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला; पण मराठी शाळांना अभिजात दर्जा कधी मिळणार? मराठी भाषेबरोबरच मराठी शाळा जगणं महत्त्वाचं आहे. मराठी शाळा या कशा जगतील आणि त्या कशा बहरतील याकडे मराठी भाषेबरोबरच मराठी कृती समिती आणि मराठी अभ्यास केंद्राला पाठिंबा देण्यासाठी इथे आलो आहे.”
यानंतर सुमितने मराठी शाळांमधील शिक्षकांबद्दल म्हटलं, “शिक्षकांबद्दलचा निर्णय हा सरकार दरबारचा विषय आहे. हा रेटा लावून धरलाच पाहिजे. मराठी शाळांना काही पर्यायच नाही. तुम्ही बाकीच्या शाळांना महत्त्व देत आहात, इंग्रजी माध्यमाला महत्त्व देत आहात; तसंच मराठी शाळा का जगत नाहीत? याकडे लक्ष दिलं गेलंच पाहिजे. मराठी शिक्षक जनगणना करतात आणि निवडणुकीची कामे करतात हे बरोबर नाही.”
यानंतर सुमीत म्हणाला, “मराठी शाळा दुर्लक्षित आहेत, मराठी शाळांच्या पायाभूत सुविधाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मराठी भाषा पर्याय असू शकत नाही, हा या मातीतला विषय आहे. मी नुकत्याच एका कार्यक्रमात वाक्य ऐकलं की, बाकीच्या भाषा या मावश्या आहेत, पण जी माय आहे; ती मराठी आहे. ती माय जगवायची असेल आणि तारायची असेल; तर शाळा जगल्याच पाहिजेत.”
यापुढे सुमीतने मराठी भाषेबद्दल कलाकारांच्या व्यक्त होण्याबद्दलही आपलं मत मांडलं. याबद्दल तो म्हणाला, “हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मराठी भाषेसाठी कोणी हातचं राखू नये असं मला वाटतं. मराठी भाषा अनिवार्य असलीच पाहिजे. सक्ती असेल तर ती मराठीचीच असायला हवी. सरकारने आपली भूमिका बदलणं गरजेचं आहे आणि ती बदललेली आहे. मग पुन्हा सरकारने वेगळा पवित्रा घेऊ नये. त्याची काही गरज नाही. या निर्णयाचा सोक्षमोक्ष लावलेला आहे, त्याला उकरून काढू नये आणि जर उकरून काढायचं झालं तर मी पुन्हा इकडे आंदोलनासाठी येईन.”