यश सहजासहजी मिळत नाही, प्रत्येक व्यक्ती आपल्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट करते. अभिनय क्षेत्रात स्वत: चं स्थान निर्माण करणं सोपं नाही. अनेक वर्ष नकार पचवत, प्रयत्न व संघर्ष करत चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळते. यश मिळाल्यानंतर अनेक कलाकार त्यांच्या संघर्षाबद्दल सांगत असतात. बॉलीवूडमध्ये अनेकांनी कठोर परिश्रम करून नाव कमावले आणि जगभरात प्रसिद्धी मिळवली. असाच एक स्टार म्हणजे सुनील शेट्टी होय.
सुनील शेट्टी एका साधारण दक्षिण भारतीय कुटुंबातून येतो. त्याने इंडस्ट्रीत पदार्पण केलं, तेव्हा गॉडफादर कोणीच नव्हतं. त्याचा पहिला चित्रपट हिट झाला होता, पण एका समीक्षकाने त्याच्यावर दाक्षिणात्य पदार्थांचा उल्लेख करत टीका केली होती. सुनील वाईट अभिनेता आहे, असं त्या समीक्षकाचं मत होतं.
सुनील शेट्टीने बॉलीवूडमधील अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ९० च्या दशकातील आघाडीचा अभिनेता असलेला सुनील त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. यशस्वी अभिनय कारकीर्द असलेल्या सुनील शेट्टीला सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्याचा पहिला चित्रपट ‘बलवान’ प्रदर्शित झाला होता, तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. पण तरीही काही लोकांना वाटलं की तो एक वाईट अभिनेता आहे. अनेकांनी त्याला इडली आणि वडे विकायचा सल्ला दिला होता, याचा खुलासा स्वतः सुनील शेट्टीने केला आहे.
रेडिओ नशाशी बोलताना सुनील शेट्टीने त्याच्या कधीही प्रदर्शित होऊ शकलेल्या ‘फौलाद’ आणि ‘आरझू’ या दोन चित्रपटांबद्दल सांगितलं. ‘आरझू’चे ६०-६५ दिवस चित्रीकरण केले होते पण दिग्दर्शक आणि निर्मात्यांमध्ये मतभेद होते ज्यामुळे चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही.
समीक्षकाने केलेली टीका
१९९२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बलवान’ हिट ठरला होता. “एका खूप मोठ्या समीक्षकाने, म्हटलं की चित्रपट हिट झाला असला तरी मी खूप वाईट अभिनेता आहे. सुनील शेट्टीच्या अभिनयावर, त्याच्या चालण्यावर आणि त्याच्या शरीरावर टीका करताना समीक्षकाने लिहिलं की, ‘त्याने त्याच्या हॉटेलमध्ये इडली-वडा विकायला हवा.’ या टिप्पणीचा कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही कारण दक्षिण भारतीय पदार्थ हे उत्पन्नाचे साधन होते,” असं सुनील शेट्टी म्हणाला.
सुनील शेट्टी अक्षय कुमारबद्दल काय म्हणाला?
त्याच मुलाखतीत सुनील शेट्टी अक्षय कुमारबद्दल व्यक्त झाला. तो म्हणाला. “अक्षय कुमारला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा मला माझ्या दिवंगत चुलत भावाची आठवण आली होती. तो अक्षय सारखाच दिसायचा.” म्हणून, एका शूटिंग दरम्यान सुनीलने अक्षय कुमारला सांगितलं, “मला दररोज तुझ्याबरोबर काम करावे लागणार याची मला भीती वाटतेय, कारण जेव्हा जेव्हा मी तुला बघेन तेव्हा मला माझ्या भावाची आठवण येईल.”
सुनील शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात दिसणार आहे, त्यानंतर ही जोडी ‘हेरा फेरी ३’ मध्येही एकत्र दिसणार आहे.