बॉलिवूडमधील ‘अन्ना’ म्हणजेच सुनील शेट्टीने गेल्या तीन दशकात प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारात सुनील शेट्टीने कायमच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. नुकतीच सुनील शेट्टीने ‘सुपर डान्सर -4’ च्या मंचावर हजेरी लावली होती. या भागात स्पर्धकांनी सुनील शेट्टीच्या लोकप्रिय गाण्यांवर दमदार परफॉर्मन्स सादर केले आहेत. या खास एपिसोडचा प्रोमो सोनी टीव्हीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय. या प्रोमोत एक डान्स परफॉर्मन्स पाहून सुनील शेट्टी भावूक झाल्याचं दिसतंय.

या एपिसोडमध्ये स्पर्धकांनी ‘बॉर्डर’ सिनेमातील ‘संदेसे आते आहे’ या लोकप्रिय गाण्यावर परफॉर्मन्स सादर केला. हा परफॉर्मन्स पाहून सुनीलला भावना आवरणं कठीण झालं आणि सुनीलचे डोळे पाणावले. सुनीलच्या अश्रूंचा बांध फुटला. यानंतर शोमध्ये काही काळ वातावरण भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

‘बॉर्डर’ सिनेमातील गाण्यावरील परफॉर्मन्स संपल्यानंतर सुनील शेट्टी उभा राहिला आणि त्याने सॅल्यूट केलं. तो म्हणाला, “हे गाणं ऐकून मी प्रत्येक वेळी रडतो. ही या युनिफॉर्मची ही जादू आहे.” बॉर्डर सिनेमात सुनील शेट्टीची महत्वाची भूमिका होती.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि सुनील शेट्टी ‘धडकन’ सिनेमात एकत्र झळकले होते. या एपिसोडमध्ये शिल्पा आणि सुनीलने ‘धडकन’ सिनेमातील गाण्यावर एकत्र डान्स केला. हा खास एपिसोड येत्या विकेण्डला प्रेक्षकांना पाहता येणार आहे.