बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. या जोडप्याने यापूर्वी घटस्फोटाच्या बातम्यांना अफवा म्हणून फेटाळून लावले होते.

घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान सुनीता यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, त्यांना एका हँडसम बॉलीवूड अभिनेत्यावर क्रश होता आणि त्यामुळेच त्यांनी गोविंदाशी लग्न केले. त्याचे नाव ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

सुनीता आहुजाने अलीकडेच ‘ईट ट्रॅव्हल रिपीट’ला मुलाखत दिली. यादरम्यान, सुनीता यांना त्यांच्या किशोरवयीन क्रशबद्दल विचारले असता, त्यांनी लगेच या अभिनेत्याचे नाव घेतले. हा अभिनेता दुसरा कोणी नसून, ते ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आहेत. सुनीता म्हणाल्या, “मला दुसरे कोणी आवडत नाही; पण आता मला शाहरुख खान खूप आवडतो. मला तो आवडतो. तो एक सज्जन माणूस आहे. पण, मी किशोरवयीन असताना मला फक्त धरमजी आवडायचे. मी गोविंदाशी लग्न केले. कारण- तो धरमजींसारखा दिसतो. दोघेही पंजाबी आहेत.

गोविंदाच्या आधी सुनीता यांना हा अभिनेता आवडायचा

सुनीता यांनी त्याच मुलाखतीत सांगितले होते की, एकदा गोविंदाने ‘सँडविच’ चित्रपटात धर्मेंद्र यांच्यापासून प्रेरित भूमिका साकारली होती. त्या चित्रपटातील गोविंदाच्या अभिनयाने त्यांना धर्मेंद्र यांची आठवण झाली. सुनीता म्हणाल्या की, त्यांनी स्वतः धर्मेंद्र यांनादेखील हे सांगितले होते. “मी एकदा धर्मेंद्रजींना सांगितले होते की, मी लग्न केले. कारण- ते तुमच्यासारखे दिसतात.” सुनीता यांनी अलीकडेच स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे, ज्यावर त्या त्यांच्या घरकाम करणाऱ्या महिलेबरोबर व्लॉगिंग करीत आहेत.

९० च्या दशकातील सुपरस्टार गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यात घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा अनेकदा होत असतात, पण या चर्चा केवळ अफवा असल्याचे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या घटस्फोटाची सर्वांत आधी चर्चा फेब्रुवारी २०२५ मध्ये सुरू झाली होती. हे दोघे कित्येक दिवसांपासून वेगवेगळे राहत असल्याचेही म्हटले गेलेय.