सनी देओलचा ‘ढाई किलो का हाथ’ हा प्रसिद्ध डायलॉग आता त्याची ओळख बनला आहे. ‘दामिनी’ चित्रपटातील हा डायलॉग अजूनही लोकांच्या ओठांवर आहे. अलीकडेच एका मुलाखतीत सनी म्हणाला की, आज त्याला याचा अभिमान आहे.

सनी देओलने त्याचा प्रसिद्ध डायलॉग ‘ढाई किलो का हाथ’बद्दल सांगितले की, सुरुवातीला त्यामुळे त्याची खूप चिडचिड व्हायची. तो जिथे जिथे जायचा तिथे तिथे लोकांची त्याच्याकडून हा डायलॉग ऐकण्याची इच्छा असायची. तो म्हणाला की, ही अभिमानाची गोष्ट आहे; पण तीच गोष्ट पुन्हा पुन्हा केल्याने मला असे वाटले की, अजून बरेच काही करायचे आहे.

हा डायलॉग १९९३ च्या ‘दामिनी’ चित्रपटातील आहे, जिथे न्यायालयीन दृश्यात तो म्हणाला होता- “जब ये ढाई किलो का हाथ किसी पर पड़ता है, तो आदमी उठता नहीं, उठ जाता है.” ही ओळ अजूनही बॉलीवूडमधील सर्वांत दमदार आणि संस्मरणीय ओळींमध्ये गणली जाते.

अलीकडेच त्याने २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाट’ चित्रपटात हा डायलॉग पुन्हा उच्चारला. सुरुवातीला तो यासाठी तयार नव्हता; परंतु नंतर त्याला समजले की, तो कथेला साजेसा आहे. तेव्हापासून हा डायलॉग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

आता सनी देओल दोन मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. पहिला चित्रपट ‘बॉर्डर २’ आहे, जो २३ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यात त्याच्याबरोबर वरुण धवन, दिलजीत दोसांझ व अहान शेट्टीदेखील दिसतील. दुसरा चित्रपट ‘रामायण’ आहे, ज्यामध्ये सनी हनुमानाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर राम, साई पल्लवी सीता आणि यश रावणाची भूमिका साकारणार आहे. रामायण दोन भागांत बनवला जाईल – पहिला भाग २०२६ च्या दिवाळीला आणि दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीला प्रदर्शित होईल.

सनीचा बॉर्डर २

सनी आता ‘बॉर्डर २’मध्ये दिसणार आहे, जो त्याच्या १९९७ मध्ये आलेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटाचा सीक्वेल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केले आहे. भूषण कुमार व जे. पी. दत्ता यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या काही दिवस आधी सनीचे पोस्टर प्रदर्शित झाले होते, ज्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. सनीने पोस्टर शेअर करीत लिहिले, ”आम्ही पुन्हा एकदा हिंदुस्थानसाठी लढू…”. या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.