बॉलीवूड अभिनेता सनी देओलने त्याच्या कारकिर्दीत एकामागून एक हिट चित्रपट दिले आहेत. गेल्या काही वर्षांत त्याने अनेक सुपरस्टार अभिनेत्रींबरोबर काम केले आहे. मग ती अमृता सिंग, माधुरी दीक्षित व मीनाक्षी शेषाद्री असो. त्याचप्रमाणे त्याने अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबरोबरही काम केले आहे.

सनी देओलने श्रीदेवी यांच्याबरोबर ‘चालबाज’, ‘जोशिले’ आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत सनी देओलने सांगितले की, त्याचे श्रीदेवी यांच्याशी फार कमी बोलणे झाले. कारण- त्यांच्या भूमिका आणि काम पूर्णपणे वेगळे होते.

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत सनी देओलला त्याच्या आवडत्या सह-कलाकार नायिकेबद्दल विचारण्यात आले. त्यानंतर त्याने अनेक नायिकांची नावे घेतली. तसेच, त्याने कोणाशी जास्त बोलणे झाले नाही हेदेखील सांगितले. ते नाव श्रीदेवी यांचे होते. सनी देओल म्हणाला, “श्रीदेवी यांच्याशी जास्त संवाद न होण्यामागे एकमेव कारण होते. ज्या पद्धतीने त्या वागायच्या, बोलायच्या ते सर्व खूप चांगले होते. मी त्यांच्याशी खूप प्रामाणिक होतो. त्या एक हुशार अभिनेत्री होत्या. त्या अशा होत्या की, शेवटच्या क्षणी त्यांचे पात्र सुधारत असे. म्हणून त्यांच्याशी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे होते.”

श्रीदेवी आणि सनी देओलचे चित्रपट

सनी देओलच्या आधी ‘चालबाज’ चित्रपटाचे दिग्दर्शक पंकज पराशर यांनीही श्रीदेवी आणि अभिनेत्याबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला होता. त्यांनी सांगितले होते की, सनी देओलला श्रीदेवी यांच्याबरोबर नाचण्याची भीती वाटत होती. अशा परिस्थितीत एके दिवशी तो दोन तासांसाठी सेटवरून निघून गेला होता.

‘चालबाज’मधील ‘ना जाने कहाँ से आया है’ या गाण्यासाठी श्रीदेवी यांना उत्तम कोरिओग्राफी आणि व्हिज्युअल्स हवे होते, जेणेकरून गाणे चांगले होईल. म्हणून निर्मात्यांनी ठरवले की, सनी देओलही त्यांच्याबरोबर परफॉर्म करील. नवीन कल्पनांवर काम सुरू झाले आणि डान्सची तयारी सुरू झाली. जेव्हा डान्सची वेळ झाली तेव्हा त्याने बाथरूममधून येईन, असे सांगितले. दोन तास उलटले; पण सनी देओल आला नाही. नंतर तो आला आणि त्याने गाणे पूर्ण केले.

सनी देओलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा गोपीचंद मालीनेनी दिग्दर्शित ‘जाट’ या अ‍ॅक्शन-पॅक्ड चित्रपटात दिसला होता. सध्या तो १९९७ च्या हिट चित्रपट ‘बॉर्डर’च्या सीक्वेलमध्ये व्यग्र आहे. त्यानंतर तो ‘लाहोर १९४७’मध्येही दिसणार आहे.