बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला आता दिड महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. मुंबई व बिहार पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान या प्रकरणात आता अभिनेता डीनो मोरिया याचं देखील नाव घेतलं जात आहे. भाजपा नेता नारायण राणे यांनी अलिकडेच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सुशांतच्या मृत्यू प्रकरणावर भाष्य करताना डीनो मोरियाचं नाव घेतलं होतं. त्यांच्या या आरोपांवर डीनोने प्रतिक्रिया दिली आहे. मला उगाचच या प्रकरणामध्ये खेचू नका, असं प्रत्युत्तर त्याने दिलं आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे?

“सुशांतच्या मृत्यूपुर्वी १३ तारखेला डीनो मोरियाने आपल्या घरी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये सहभागी झालेले काही कलाकार त्या रात्री सुशांतच्या घरी गेले होते.” असा दावा नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. मात्र हा दावा डीनो मोरियाने फेटाळून लावला आहे. “माझ्या घरी मी कुठल्याही पार्टीचं आयोजन केलं नव्हतं. पुन्हा एकदा आपले फॅक्ट तपासून पाहा. कृपया मला जबरदस्तीने या प्रकरणात खेचू नका. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन डीनोने नारायण राणेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं. त्याचं हे ट्विट सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

सुशांत मृत्यू प्रकरण : मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलेले १० महत्त्वाचे मुद्दे

१. सुशांत मृत्यू प्रकरणी आतापर्यंत ५६ लोकांचे जबाब नोंदवले गेले आहेत. व्यावसायिक वैर, आर्थिक व्यवहार किंवा आरोग्य अशा सर्व मुद्द्यांवरून तपास सुरू आहे.
२. सुशांत दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व (bipolar disorder) या मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्यासाठी तो उपचार घेत असल्याचं उघडकीस आलं आहे.
३. कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला हा आमच्या तपासाचा विषय आहे.
४. १६ जून रोजी सुशांतचे वडील, बहीण आणि मेहुण्याचा जबाब नोंदवला गेला.
५. त्यावेळी सुशांतच्या कुटुंबीयांनी आमच्या तपासाबद्दल कोणतीच शंका उपस्थित केली नव्हती. आमच्या तपासात काही त्रुटी असल्याची तक्रारसुद्धा त्यांनी केली नव्हती.
६. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवलेल्या ५६ लोकांमध्ये रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे.
७. रियाचा जबाब दोन वेळा नोंदवला गेला. तिला पोलीस ठाण्यातही अनेकदा बोलावलं गेलं.
८. ती आता कोठे आहे, याबाबत मी वक्तव्य करू शकत नाही.
९. बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढून घेण्यात आले.
१०. सुशांतच्या खात्यात १८ कोटी रुपये होते आणि त्यापैकी साडेचार कोटी रुपये अजूनही खात्यात आहेत, असं आमच्या तपासात निदर्शनास आलं. सुशांतच्या अकाऊंटमधून रियाच्या अकाऊंटमध्ये थेट पैसे ट्रान्सफर झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबत अजून तपास सुरू आहे.