‘झी मराठी’ वाहिनीवर बऱ्याच काळानंतर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही ऐतिहासिक मालिका २५ सप्टेंबर २०१७ पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. संभाजीराजांचे रुप, त्यांचा इतिहास मालिकेत कसा दाखवला जाईल, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात पिंगा घालू लागले होते. पण जेव्हा छोट्या पडद्यावर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली तेव्हा लोकांनी अक्षरश: त्याला डोक्यावर उचलून घेतलं. आता या मालिकेने तब्बल ५०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. मालिकेचे दिग्दर्शक कार्तिक केंढे यांनी फेसबुकवर संपूर्ण टीमचा फोटो शेअर केला आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा ५०० वा भाग शनिवारी प्रसारित होणार आहे. संपूर्ण मालिकेच्या टीमचा फोटो शेअर करत दिग्दर्शकांनी रसिकप्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालिकेत संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी डॉ. अमोल कोल्हेंनी शारीरिक, बौद्धिक व मानसिक या तिन्ही स्तरांवर विशेष मेहनत घेतली. मालिका सुरू होण्यापूर्वी त्यांनी या तयारीबद्दल सांगितलं होतं. शारीरिक स्तरावर मी भारदस्त छाती, धिप्पाड शरीर यासाठी बराच काळ मेहनत घेतली आणि अजूनही घेतोय. बौद्धिक स्तरावर मेहनत घेताना मी ज्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांवर पुस्तकं लिहिली आहेत ती पुस्तकं तसेच ज्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांवर प्रबंध लिहिले आहेत तेही वाचले. प्रत्येकाचं महाराजांवरचं लिखाण, त्यांचा महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता. तो दृष्टिकोन मी समजून घेतला. आपली मालिका ही इतिहासाच्या एकेकाळच्या सुवर्णकाळाचे प्रतिनिधित्व करणारी आहे. त्यामुळे इतिहासाला कुठेही गालबोट न लागता ही मालिका प्रेक्षकांसमोर सादर करणं आणि आजच्या तरुणाईला संभाजींची ओळख करून देणं याचं भान ठेवत ही मालिका केली असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.