आतापर्यत चॉकलेट बॉय म्हणून परिचित असलेला स्वप्नील जोशी लवकरच त्याच्या चाहत्यांना ‘स्त्री’ अवतारात पाहायला मिळणार आहे. आगामी ‘फुगे’ या सिनेमातील एका सीनसाठी स्वप्नीलने हा अवतार धारण केल्याचे समजते. लाल रंगाचा लेडीज टॉप, त्याला साजेशी लिपस्टिक आणि काळे डूलदार कानातले घातलेल्या स्वप्नीलचा हा ‘गर्ली’ लूक त्याच्या स्त्री चाहत्यांना अचंबित करून सोडणारा आहे. इंदरराज कपूर प्रस्तुत ‘फुगे या सिनेमातील आपल्या या अवताराबद्दल बोलताना स्वप्नीलने सांगितले की, कोणत्याही अभिनेत्याला आपली कला सादर करण्यासाठी सिनेमाची कथा अधिक महत्वाची असते. जर त्या कथेची गरज असेल तर तसा पेहराव आणि भूमिका करणे अपरिहार्य असते. लोकांना हसवण्यासाठी किवा विनोदाचा भाग म्हणून नव्हे तर, ‘फुगे’ या सिनेमाच्या कथेची गरज ओळखून मी अशी भूमिका करण्यास तयार झालो असल्याचे त्याने सांगितले. ‘मराठीत बनवाबनवी’ सिनेमापासून या ट्रेंडला सुरुवात झाली असून, प्रेक्षकांना देखील ते आवडत आहे. माझ्याबद्दल सांगायचे तर यापूर्वी हिंदीच्या कॉमेडी सर्कसमध्ये मी स्त्रीपात्र साकारले होते, त्यामुळे मला कठीण गेले नाही. मात्र चित्रपटात अशी भूमिका करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे’, असे स्वप्नीलने पुढे सांगितले.
बॉलीवूडमध्ये अशाप्रकारे नायकाने स्त्रीची वेशभूषा करणे ही काही नवखी गोष्ट नाही. अमिताभ बच्चन, अमीर खान, अजय देवगण, शर्मन जोशी तसेच रितेश देशमुख या हिंदीच्या स्टार नायकांनी देखील स्त्री व्यक्तिरेखा साकारत रसिकांची मने जिंकली आहेत. मराठीतील काही अभिनेत्यांनीदेखील ही ‘स्त्री’पात्र वठवली असल्यामुळे आगामी ‘फुगे’ या सिनेमातील स्वप्नीलचा हा अंदाज देखील स्वागतार्ह असाच आहे. येत्या १० फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाची निर्मिती अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांनी केली असून, स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दिग्दर्शित केला आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा मैत्री आणि प्रेम या दोन्ही गोष्टींवर भाष्य करणारा आहे. यात सुबोध भावे याची देखील प्रमुख भूमिका असणार आहे. सहकालाकार सुबोध विषयी तो भरभरून बोलतो, ‘सुबोध हा एक चांगला अभिनेता असून आम्ही ऑफ-स्क्रिन चांगले मित्र आहोत. तसेच सुबोधने साकारलेले बालगंधर्व देखील अप्रतिम होते, त्यामुळे ‘फुगे’ हा सिनेमा करताना आमच्यातील ट्युनिंग चांगलीच जमून आली होती’ असे स्वप्नील सांगतो. स्वप्नील-सुबोधच्या या हटके कॅमिस्ट्रीची बॅकस्टोरी सांगणारा हा सिनेमा नकीच प्रेक्षकांना रॉम-कॉम मेजवानी देणारा ठरणार आहे.