देशावर करोना विषाणूचं सावट असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे. काळात अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सारं काही बंद आहे. त्यामुळे या बंदच्या काळात कोणताही नागरिक अनावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस गस्त घालत आहेत. विशेष म्हणजे दिवस-रात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असणाऱ्या पोलिसांचे अभिनेता सुबोध भावेने ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत.

करोना विषाणूशी लढा देण्यासाठी संपूर्ण देशवासीय एक झाले आहेत. यामध्ये पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी यांचं मोलाचं योगदान आहे. ही मंडळी करोनापासून देशाची सुटका व्हावी यासाठी दिवस -रात्र झटत आहेत. त्यामुळे देशातील नागरिकही त्यांच्या योगदानाचं महत्त्व आणि त्यांचे परिश्रम जाणून त्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार मानत आहेत. यामध्येच काही कलाकार मंडळीही आभार व्यक्त करताना दिसतात. अभिनेता सुबोध भावेने …आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटातील संवाद आणि स्टाइलमध्ये पोलिसांचे आभार मानले आहेत. सुबोधने ट्विटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे,

“काही दिवस तुम्हा-आम्हाला घरात बसावं लागलं तर काय झालं. उसमें क्या हैं?  घाबरुन जायचं नाही आपल्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी मुंबई पोलीस सक्षम आहे  आणि दिवस-रात्र हे पोलीस बांधव-भगिनी रस्त्यावर थांबून आपल्या सर्वांचं रक्षण करतायेत. त्यांच्या या कार्याला माझा एकदम कडक सलाम”, असा व्हिडीओ सुबोधने ट्विटरवर शेअर केला आहे.

दरम्यान, आतापर्यंत अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांचे आभार मानले आहेत. यामध्ये बॉलिवूड कलाकारांनी तर ‘दिल से थँक्यू’ हा नवा ट्रेंडही सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे.