बॉलिवूडमध्ये सध्या लगीनघाई बघायला मिळत आहे. रणबीर आलिया पाठोपाठ आता सिद्धार्थ आणि कियारा यांच्यासुद्धा लग्नाची चांगलीच चर्चा होत आहे. दोघांनी करण जोहरच्या कार्यक्रमात याची कबुलीही दिली आहे. आता मनोरंजनसृष्टीतील आणखी एक अभिनेत्री लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ती अभिनेत्री म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारी हंसिका मोटवानी.

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार अभिनेत्री हंसिका मोटवानी लवकरच लग्न करणार आहे. तिच्या जवळच्या व्यक्तीकडून ही बातमी समोर आल्याचं हिंदुस्तान टाइम्सने स्पष्ट केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या वर्षाअखेरीस २ ते ४ डिसेंबरमध्ये हा लग्नसोहळा संपन्न होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाय हे एक डेस्टीनेशन वेडिंग असल्याचंही सांगितलं जात आहे.

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली? सोशल मीडियावर चर्चा; ही असू शकतात कारणं

२ आणि ३ डिसेंबरला मेहंदी आणि संगीत सोहळा संपन्न होईल आणि मग ४ तारखेला केवळ काही मित्रपरिवार आणि कुटुंब यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडेल अशी माहिती सध्या समोर येत आहे. लग्नासाठी खास असा ड्रेस कोड आणि थीमदेखील ठरवण्यात आली आहे शिवाय लग्न जयपूरमधील एका पॅलेसमध्ये पार पडणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हंसिकाच्या जवळच्या लोकांनी हे अरेंज मॅरेज असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण काहींच्या मते हंसिका त्या मुलाला गेली काही वर्षं डेट करत होती. नवऱ्या मुलाचं नाव आणि ओळख दोन्ही अजून गुलदस्त्यात ठेवलं आहे. याबाबत हंसिका हीने मीडियाला काहीच स्टेटमेंट दिलेलं नसलं तरी ती लवकरच याची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हंसिकाने तमिळ, तेलुगू आणि हिंदी अशा भाषांमधील बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे.