बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने वर्षाची सुरुवात ही धमाकेदार केली आहे. त्याचा यंदाच्या वर्षातील पहिला चित्रपट ‘तान्हाजी’ ब्लॉकबस्टर ठरला आहे. इतर चित्रपटांची टक्कर असतानाही ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट चौथ्या आठवड्यातही चांगली कमाई करत आहे. या चित्रपटानंतर अजय दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटात काम करणार आहे. ‘तान्हाजी’च्या यशानंतर अजय ‘RRR’ चित्रपटासाठी किती मानधन घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

‘RRR’ चित्रपटात अजयसोबत जूनियर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या इतकेच मानधन अजय देवगणला देण्यात येणार होते. मात्र मैत्री खातर अजयने या चित्रपटसाठी कोणत्याच प्रकारचे मानधन घेतले नसल्याचे वृत्त नवभारत टाईम्सने दिले आहे.

अजय देवगण आणि राजामौली यांची मैत्री ‘ईगा’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. ‘ईगा’ चित्रपटाचे दिग्दर्शन राजामौली यांनी केले होते. तसेच या चित्रपटाची कथा त्यांचे वडिल के. वी. विजेंद्र यांनी लिहिली होती. तेलुगू आणि तामिळमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट ‘मक्खी’ या नावाने हिंदीमध्ये डब करण्यात आला. या चित्रपटाला अजय आणि काजोलने व्हॉइस ओवर दिला.

‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि त्यानंतर ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटांनी सगळ्यांनाच थक्क करुन सोडले होते. आता राजामौलींचा ‘RRR’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, राम चरण, ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर चित्रपटात स्वातंत्र सैनिकांची भुमिका साकारणार असून आलिया भट्ट आणि अजय देवगन सहाय्यक कलाकार असणार आहेत. चित्रपट ८ जानेवारी २०२१प्रदर्शित होणार असून तेलगू, तामिळ, हिंदी, मल्याळम आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.