स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत पुढे आहे. या मालिकेतील कलाकारांवर तर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. त्यातीलच एक कलाकार म्हणजे मिलिंद गवळी. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. सोशल मीडियावरही ते कायमच सक्रिय असतात. आताही त्यांनी इन्स्टाग्रामद्वारे एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. आज त्यांच्या लग्नाचा ३३वा वाढदिवस आहे. याचनिमित्त त्यांनी पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
मिलिंद यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचबरोबरीने त्यांनी त्यांच्या पत्नीचं तोंडभरुन कौतुकही केलं आहे. ते म्हणाले, “दिपा आणि माझा आज लग्नाच्या वाढदिवस. तीन दशकाहून अधिक काळ अशा माणसाबरोबर संसार केला जो गावोगावी जाऊन डोंबाऱ्याच्या खेळा सारखा सिनेमा, मालिकांचा खेळ करत आहे. आणि बऱ्याच वेळेला महिने महिने काम करून सुद्धा घरी येताना संसार चालवण्यासाठी काहीच पैसे घरी घेऊन आलेलो नसायचो. बरेचसे निर्माते मला माझे ठरलेले पैसेसुद्धा द्यायचे नाहीत. आपल्या हक्काचे पैसे मागायची आजही मला सवय नाही”.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – “माझे वय ६० वर्ष नाही तर…”, व्हिडीओ शेअर करत आशिष विद्यार्थी यांचा खुलासा, दुसऱ्या पत्नीच्या वयाबाबत म्हणाले…

“हा संसाराचा गाडा कसा पुढे ढकला असेल? हे खरंतर दिपालाच ठाऊक. पण कधी एका शब्दांनी विचारलं नाही. कधी कुरकुर केले नाही. कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट केला नाही. उलट काटकसर करायची सवयच लाऊन घेतली. इतकी सवय लागली की आजही पार्टी करायची म्हटली तरीही एखादी भेळ किंवा पाणीपुरी खाल्ली की ती समाधान मानते. अगदीच आजही कधी तरी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आम्ही जेवलोच तरी एखादं दहा-पंधरा रुपयाचं चोकोबार आईस्क्रीम खाल्लं की मगच चैन वगैरे केल्यासारखं तिला वाटतं. आहे त्या परिस्थितीत खूप समाधानी राहायचं हे तिच्याकडून शिकण्यासारखा आहे”.

“कठीण असतं एका कलाकाराबरोबर संसार करणं आणि तो कलाकार जर यशस्वी नसेल तर संसाराचा गाडा पुढे ढकलत राहणं फारच कठीण होत जातं. काम नसायचं त्यावेळी लोक मुद्दामून अडून नडून विचारायचे की, “काय मग आता घरीच आहेस का? शूटिंग वगैरे नाही का?” पण त्या काळातही दिपाने मला कधीही जाणीव करून दिली नाही की, मी एक अयशस्वी अभिनेता आहे. बरं मला माझ्या आई-वडिलांनी राजेशाही पद्धतीने वाढवलं असल्यामुळे स्वतः जाऊन काम मागायची मला सवयच नव्हती. त्यामुळे महिने महिने काहीही काम मिळायचं नाही. सातारा कोल्हापूरचे पिक्चर यायचे त्यात पैसे अगदीच कमी मिळायचे”.

आणखी वाचा – साध्या पद्धतीने लग्न पण दत्तू मोरेचं रिसेप्शन थाटामाटात पार, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी लावली हजेरी

“या सगळ्या परिस्थितीमध्ये घर सांभाळायचं, नातेवाईक सांभाळायचे. मिथीलाची तर संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी फक्त दिपानेच घेतली होती. सकारात्मक विचार आणि परमेश्वरावर अपार श्रद्धा. आमच्या लग्नाचा वाढदिवस आला की, मला जाणवतं की इतकी वर्ष या माऊलीने माझ्या बरोबर किती आनंदाने हा संसार केला. खूप खडतर प्रवास केला आणि आजही करत आहे. तिचे जितके आभार मानू तितके कमी आहेत. दिपा तुला आपल्या ३३व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”. मिलिंद यांनी शेअर केलेली पोस्ट खरंच कौतुकास्पद आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kute kay karte fem actor milind gawali share emotional post on 33 wedding anniversary see details kmd
First published on: 26-05-2023 at 19:54 IST