‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दैनंदिन जीवनातील येणारे प्रत्येक अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. शिवाय स्वतःची परखड मत देखील व्यक्त करत असतात. नुकतीच मिलिंद गवळी यांनी पत्नीच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिलेली सुंदर पोस्ट शेअर केली आहे. याबरोबर पत्नीच्या जुन्या फोटोंचा व्हिडीओ देखील त्यांनी शेअर केला आहे.

मिलिंद गवळी यांनी पत्नीसाठी लिहिलेली पोस्ट वाचा…

हॅपी बर्थडे दीपलक्ष्मी

दिपा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, मला जर कोणी विचारलं की दीपाचा हा कितवा वाढदिवस आहे तर मी म्हणेन अठरावा. कारण आजही तुझ्यामध्ये ती ऊर्जा; जी एका कॉलेजमधल्या तरुण मुलीमध्ये असते तिच आहे. म्हणूनच अजूनही मी २३ वर्षांचा आहे. मला इतकी वर्ष काम करायची, मेहनत करायची जी ऊर्जा मिळाली आहे ती तुझ्याकडूनच मिळाली आहे.

माझ्या आयुष्याच्या खडतर प्रवासामध्ये तू कधीही तक्रार न करता, मला कायम सपोर्ट करत, माझी साथच देत आली आहेस. स्वतःच्या आशा, आकांक्षा, इच्छा, स्वप्न सगळी सगळी बाजूला ठेवून माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं आहेस. स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून माझ्या आवडीनिवडीच जपत आली आहेस. खरंच तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. रोजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये शांतपणे बसून आपण एकमेकांना कधी मनातलं सांगत नाही. पण आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुझ्याबद्दल लिहावंस वाटलं. आपले काही जुने फोटो पोस्ट करावेसे वाटले. मला माहितीये सोशल मीडियावर तुला वैयक्तिक गोष्टी टाकायला आवडत नाही, पण मला असं वाटतं कधीतरी, अशा छान दिवशी पोस्ट करायला, फोटो टाकायला काही हरकत नाही.

खरंतर आज तुझा वाढदिवस आहे. खूप छान दिवस आहे. आज अक्षय्य तृतीया पण आहे. आज तुझ्याबद्दल एखादी पोस्ट मी करायला काहीच हरकत नाही. माझ्यासाठी तू आयुष्यामध्ये खूप गोष्टींचा त्याग केला आहेस. वैयक्तिकबाबतीत तर केले आहेसच, पण खूप कमी लोकांना ठाऊक असेल तुझा वैयक्तिकबाबतीतला त्याग.

आपलं नवीन लग्न झालं होतं आणि आयोडेक्सच्या जाहिरातीच्या ऑडिशनसाठी मला बोलवण्यात आलं होतं. तुला मी माझ्याबरोबर ऑडिशनला घेऊन गेलो होतो आणि तिथे तुला निवडण्यात आलं होतं आणि मला रिजेक्ट केलं होतं . तू त्या एकमेव जाहिरातीमध्ये काम केलं होतंस. पण तू माझ्यासाठी आणि आपल्या लेकीसाठी, आपल्या घरासाठी तुझ्या करिअरचा त्याग केलास. नाहीतर आज नक्कीच तू माझ्यापेक्षा कित्येक पटीने यशस्वी आणि लोकप्रिय झाली असतीस. तुला उदंड आयुष्य लाभो, तुझी सगळी स्वप्न अशा आकांक्षा पूर्ण होऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे प्रेम.

हेही वाचा – Video: २० वर्षांचा ‘बिग बॉस’ फेम अब्दु रोजिक लवकरच चढणार बोहल्यावर; आनंदाची बातमी देत जाहीर केली लग्नाची तारीख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मिलिंद गवळी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी बऱ्याच मराठीसह हिंदी चित्रपटात काम केलं आहे. शिवाय ते अनेक हिंदी मालिकेही झळकले आहेत. सध्या त्यांची ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे.