Aai Kuthe Kay Karte Fame Actress Enters In New Serial : छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नेहमीच विविध ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि टीआरपीत सातत्य राखण्यासाठी वेगवेगळे ट्विस्ट आणले जातात. कधी मालिकेत लीप येतो, तर काहीवेळा कथानकाच्या गरजेनुसार मालिकेत लोकप्रिय कलाकारांच्या एन्ट्री होतात. काही दिवसांपूर्वीच ‘ठरलं तर मग’ मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री क्षिती जोगने साक्षी शिखरेच्या वकिलाची भूमिका साकारण्यासाठी एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. आता ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. ती कोण आहे जाणून घेऊयात…
‘स्टार प्रवाह’वरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका घराघरांत लोकप्रिय होती. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. अरुंधती, अनिरुद्ध, संजना, आप्पा, ईशा या सगळ्या पात्रांनी अल्पावधीतच घराघरांत पसंती मिळवली होती.
‘आई कुठे काय करते’मध्ये अनघा हे पात्र अभिनेत्री अश्विनी महांगडेने साकारलं होतं. मालिका संपल्यावर ६ महिने उलटून गेले असले तरीही आजही प्रेक्षक अश्विनीला अनघा म्हणूनच ओळखतात. प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री आता नव्या रुपात पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे.
अश्विनी महांगडेने ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री घेतली आहे. या मालिकेचं नाव आहे ‘घरोघरी मातीच्या चुली’. रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका रोज संध्याकाळी साडेसात वाजता वाहिनीवर प्रसारित केली जाते. या मालिकेत अश्विनी महांगडे ‘माया’ हे पात्र साकारणार आहे.
अश्विनी साकारत असलेल्या माया या भूमिकेचा लूक खूपच हटके आहे. साधा ड्रेस, केसांची वेणी, डोळ्याला मोठा चष्मा या मायाच्या लूकमधील फोटो अश्विनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या नव्या प्रोजेक्टसाठी अश्विनीला चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. सीमा घोगळे, निखिल चव्हाण, कृतिका देव, गौरी कुलकर्णी, सुमंत ठाकरे, अभिषेक देशमुख या सगळ्या कलाकारांनी अश्विनीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.