Aai Kuthe Kay Karte Fame Actress : पंढरपूरचा विठुराया म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. सध्या आषाढी वारीच्या निमित्ताने लाखों वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली आहे. आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्याची ओढ या वारकऱ्यांना लागली आहे. कधी एकदा पंढरपूरला पोहोचतोय आणि पांडूरंगाच्या चरणावर मस्तक ठेवतोय, अशी अवस्था सध्या प्रत्येक वारकऱ्याची आहे.

सामान्य वारकऱ्यांबरोबरच अनेक कलाकारही पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन व्हावं अशी इच्छा व्यक्त करत असतात. त्यामुळे अनेक कलाकार मंडळीसुद्धा विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी पोहोचतात. अशातच ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेमधील अभिनेत्री कौमुदी वलोकरनेही पंढरपूरला जात विठ्ठलाचं दर्शन घेतलं आहे.

कौमुदी ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे काही फोटो शेअर करत असते. तसंच कामानिमित्तची माहितीसुद्धा शेअर करत असते. अशातच तिने पंढरपूरला जाऊन दर्शन घेतल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच दर्शन झाल्यानंतरच्या भावनाही तिने व्यक्त केल्या आहेत.

कौमुदी वलोकर इन्स्टाग्राम व्हिडीओ

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कौमुदी कपाळावर चंदनाचा टिळा लावत आहे. यावेळी तिच्यासह तिचं कुटुंब असल्याचंही या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. पंढरपूरमधील संत नामदेव महाद्वार इथे संपूर्ण कुटुंबासह फोटो काढला असून त्या फोटोची खास झलक तिने व्हिडीओद्वारे शेअर केली आहे.

पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतरच्या आनंदी भावनाही कौमुदीने व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओखाली तिने असं म्हटलंय, “त्याने सारे काही पाहिलं आहे, त्याच्यावर माझं निस्सीम प्रेम आहे. एक अविस्मरणीय दिवस… एक अविस्मरणीय अनुभव… त्याच्या गाभाऱ्यात गेल्यावर आपसूक ऊर भरून आला आणि मन शांत झालं.”

कौमुदीने शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओखाली चाहत्यांनी ‘बोलावा विठ्ठल, जाणावा विठ्ठल’, ‘राम कृष्ण हरी’, ‘खूपच सुंदर’, ‘माऊली माऊली’ अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कौमुदी ही मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ‘शाळा’, ‘शटर’, ‘मी वसंतराव’, ‘वाय झेड’ या मराठी चित्रपटांत काम केलं आहे. शिवाय ती मालिकांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील तिची भूमिका चांगलीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.