Abhidnya Bhave Talks About Parents : अभिज्ञा भावे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठीसह हिंदीतही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री सध्या ‘तारिणी’ मालिकेतून झळकत आहे. अशातच आता तिने एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्यातील एका कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं आहे.
अभिज्ञा भावेने नुकतीच तिच्या आई-वडिलांबरोबर ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिने तिच्या दुसऱ्या लग्नानंतर वर्षभरातच नवऱ्याला झालेल्या आजारामुळे काय परिस्थिती ओढवलेली याबद्दल सांगितलं आहे. नवऱ्याच्या आजारपणाबद्दल सांगितल्यानंतर आई-वडिलांची काय प्रतिक्रिया होती याबद्दलही तिनं सांगितलं आहे.
अभिज्ञा भावेची नवऱ्याच्या आजारपणाबद्दल प्रतिक्रिया
अभिज्ञा याबद्दल म्हणाली, “मेहुलच्या आजारपणाबद्दल कळलं तेव्हा मला दडपण आलेलं की, आई-बाबांना कसं सांगायचं. कारण- अगदी एक वर्षात ते झालेलं. दुसरी गोष्ट म्हणजे एकुलती एक मुलगी आणि तिचं दुसरं लग्न असल्यानं त्यांची अशी अपेक्षा होती की, आता सगळं छान होऊ देत.”
अभिज्ञा पुढे म्हणाली, “हा धक्का ते कितपत सहन करू शकतील याची मला खात्री नव्हती; पण ज्या प्रकारे त्यांनी ती परिस्थिती सांभाळली ते पाहून मी चकित झाले होते. उलट त्यांनी मला सांगितलं की, आपण यामधून काहीतरी मार्ग काढू. आताही मेहुलच्या आजारपणासंबंधित काही छोट्या-मोठ्या गोष्टी असतात, त्यातनंसुद्धा आई-बाबांचं म्हणणं हेच असतं की, आपल्याला छानपणे कसं निघता येईल किंवा यातून तू काय शिकलीस हे बघ आणि आम्ही कायम तुझ्याबरोबर आहोत.”
अभिज्ञाच्या आई याबद्दल म्हणाल्या, “जे आता आपल्यासमोर झालं आहे, ते काही आपण बदलू शकत नाही. त्यामुळे आपण त्याचा स्वीकार करणंच जास्त चांगलं असतं. जे घडलं ते मान्य करणं आणि त्यातून मार्ग काढणं हा विचार करणं महत्त्वाचं होतं. तुम्हाला जे हवंय, ते जर सगळंच देवानं दिलं, तर मग तुम्ही त्याची आठवण कशी ठेवाल. त्यामुळे तो असे काहीतरी प्रश्न उभे करीत असतो, ज्यातून तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचता. ही आपली परीक्षा असते.”
दरम्यान, अभिज्ञा भावेच्या नवऱ्याला मेहुलला कर्करोगाचं निदान झालेलं आणि लग्नाच्या पहिल्या वाढदिवसालाच त्यांना ही बातमी समजलेली. त्यानंतर मेहुलची ट्रीटमेंट सुरू झाली आणि आता मेहुल व अभिज्ञा यांच्या लग्नाला चार वर्षं झाली आहेत. दोघेही एकमेकांबरोबर सुखाचा संसार करीत आहेत.