Abhijeet Khandkekar on Mrunmayee Deshpande: अभिजीत खांडकेकर हा लोकप्रिय अभिनेता आहे. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘सोप्पं नसतं काही’, ‘शौर्य’ अशा अनेक मालिकांमध्ये तो प्रमुख भूमिकांमध्ये दिसला आहे. त्याने काही मराठी चित्रपटांतदेखील काम केले आहे.
सध्या अभिजीत खांडकेकर ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमात सूत्रसंचालक म्हणून काम करत आहे. त्याच्या या कामाचेदेखील मोठे कौतुक होताना दिसते. नुकताच झी मराठी वाहिनीचा यावर्षीचा पुरस्कार सोहळा पार पडला.
या कार्यक्रमात तो सूत्रसंचालन करताना दिसला. कार्यक्रम सहजपणे पुढे नेण्याचे महत्त्वाचे काम सूत्रसंचालक करत असतो. अभिजीतला यामध्ये मृण्मयी देशपांडेने मोलाची साथ दिल्याचे पाहायला मिळाले. दोघांनी या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केल्याचे पाहायला मिळाले.
आता या कलाकारांनी राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी अभिजीत खांडकेकरने मृण्मयी देशपांडेबद्दल वक्तव्य केले. तो म्हणाला, “ती ज्या पद्धतीने काम निवडते, तसेच तिचा नैसर्गिक अभिनय मला फार आवडतो. मला तिच्या डोळ्यांचा प्रचंड हेवा वाटतो. माझे चिकूच्या बियांसारखे डोळे आहेत. तिला अभिनय करावाच लागत नाही. तिने नुसतं पाहिलं की सगळ्या भावना व्यक्त होतात. मला तिचा फार अभिमान वाटतो.”
पुढे मृण्मयी देशपांडे म्हणाली, “जेव्हा मी खऱ्या आयुष्यात लग्नासाठी मुलं बघत होते, तेव्हा आम्ही ओबेरॉयमध्ये भेटायचो. कुठे भेटायचं आहे, हे आमचं ठरलेलं असायचं. आमच्या बाजूला दोन टेबल सोडून अभिजीत आणि सुखदा बसलेले असायचे. मुलगा कसा आहे यावर लक्ष ठेवण्यासाठी ते तिथे असायचे. खूप आधीपासून आमची मैत्री आहे. खरोखरच जगातील कोणतीही गोष्ट मी अभिजीतला सांगू शकते. कितीही विचित्र, भयंकर गोष्ट असेल तरीही मी त्याला सांगू शकते, कारण मला माहीत आहे की तो मला जज करणार नाही, मीसुद्धा त्याला कधीच जज करणार नाही.”
मृण्मयी देशपांडे सध्या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिने दिग्दर्शित केलेला ‘मनाचे श्लोक’ हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित झाला होता. मात्र, या चित्रपटाच्या नावामुळे याला विरोध दर्शवण्यात आला. काही ठिकाणी चित्रपटाचे पोस्टर फाडण्यात आले. त्यानंतर तात्पुरते या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय घेतला असून १६ ऑक्टोबरला हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे नाव बदलण्यात येणार आहे.
चित्रपटाच्या नावाला विरोध झाल्यानंतर आणि प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक मराठी कलाकारांनी त्यांचे मत व्यक्त केले होते. तसेच त्यांनी मृण्मयीला पाठिंबा दर्शवल्याचे पाहायला मिळाले.