Hardeek Joshi Buys New Car : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादाच्या भूमिकेने आजही प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. यामध्ये लोकप्रिय अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. मालिका संपल्यावर ही राणादा अन् पाठकबाईंची ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात सुद्धा एकत्र आली. हार्दिक-अक्षया २०२२ मध्ये लग्नबंधनात अडकले. हे दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. हार्दिकने नुकत्याच शेअर केलेल्या एका खास पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हार्दिक जोशीच्या घरी नव्या आलिशान गाडीचं आगमन झालं आहे. याचा खास व्हिडीओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्याने ‘महिंद्रा स्कॉर्पिओ एन’ ही गाडी खरेदी केली आहे. हार्दिक ही नवीन गाडी खरेदी करण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसह गेला होता. याची झलक हार्दिकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हार्दिक जोशी लिहितो, “दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर आमच्या कुटुंबात या गाडीचं आगमन झालं आहे.” तसेच या कॅप्शनच्या पुढे अभिनेत्याने ‘New Family Member’ असा हॅशटॅग देखील दिला आहे.

हार्दिकने खरेदी केलेल्या ‘महिंद्रा स्कॉर्पिओ एन’ या गाडीची किंमत त्यांच्या अधिकृत वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार १३.२० लाख ते २४.१७ लाख ( एक्स शोरूम ) इतकी आहे. ( इंजिन प्रकार पेट्रोल किंवा डिझेल व्हेरिएंट तसेच वेगवेगळ्या शहरांनुसार या किंमतीत बदल होऊ शकतो. )

हार्दिकने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “कडक अभिनंदन दादा”, “एकदा ठरवलं तिच गाडी घेतली…हार्दिक दादा मस्तच”, “अभिनंदन राणादा” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.

दरम्यान, हार्दिक-अक्षयाच्या वर्तफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, हे दोघे जोडीने नुकतेच ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. काही दिवसांपूर्वीच तो ‘अरण्य’ सिनेमात झळकला होता. तर, अक्षया सध्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत भावना ही भूमिका साकारत आहे.