हिंदी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना पूरन सिंहचा अपघात झाला आहे. मुंबईतील विरारमध्ये तिच्या एका प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान ही दुर्घटना घडली. त्यामध्ये तिच्या हाताला मोठी दुखापत झाली. अर्चनाचा हात मोडल्याने तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तींनी तिला तातडीने विलेपार्ले येथील एका रुग्णालयात दाखल केले.

शूटिंगदरम्यान सेटवर झालेल्या अपघातात अर्चनाच्या मोडलेल्या हातावर डॉक्टरांनी योग्य ते उपचार केले असून, सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. या घटनेबाबत अभिनेत्रीने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. व्हिडीओमध्ये अर्चनाच्या हाताला प्लास्टर केल्याचे दिसत आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावरही सूज आहे. अर्चनाच्या ओठांनासुद्धा लागल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

अर्चनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शूटिंग सुरू असताना अचनाक अर्चनाचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज येतो. त्यानंतर तेथील उपस्थित व्यक्ती तिला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी धावपळ करतात. पुढे अर्चनाचा मुलगा आर्यमानला घडलेल्या घटनेची माहिती समजते. अर्चनाच्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागेल, ही माहिती समजल्यावर आर्यमनला धक्का बसतो आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू येतात.

या व्हिडीओमध्ये अर्चना पुढे तिचा हात दाखवत म्हणते की, आता तरी हात बरा आहे. ज्या दिवशी हात मोडला होता तेव्हा तो फार जास्त सुजला होता. हा व्हिडीओ अर्चनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. तसेच यात कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, यावर विश्वास ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे. सध्या मी ठीक आहे. फक्त एका हातानं कोणतंही काम करताना किती अडचणी येतात ते मला आता समजत आहे.”

अर्चनाने या घटनेचा व्लॉग व्हिडीओ तिच्या यूट्यूब चॅनेलवरसुद्धा पोस्ट केला आहे. त्यात तिने सांगितलं, “मी अभिनेता राजकुमार रावला स्वत: फोन केला आणि शूटिंग अर्धवट सोडून गेल्याने त्याची माफीही मागितली. तसेच प्रॉडक्शन टीमला मी लवकरच पुन्हा येईन, असं आश्वासन दिलं आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, हाताला लागलेलं असताना शूटिंग कसं करणार, असा प्रश्न अर्चनाचे पती परमित यांनी तिला विचारला. त्यावर ती म्हणाली, “शूटिंगच्या वेळी मी हात पूर्ण झाकला जाईल असे कपडे परिधान करेन. त्याने हाताला झालेली दुखापत लपवता येईल. तसेच प्रॉडक्शन टीमकडून दिलेल्या आश्वासनानुसार दररोज फक्त तीन तास या पद्धतीने शूटिंग सुरू ठेवेन.” अर्चनाला झालेल्या दुखापतीनंतर तिच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर काळजी व्यक्त केली आहे.