सध्या हे स्पर्धेचं युग आहे. आपल्या मुलांचा पहिला नंबर यावा यासाठी पालक खूप प्रयत्न करत असतात. त्यामुळे अनेकदा स्पर्धेला खूप गांभीर्याने घेतलं जातं. रिअॅलिटी शोजच्या बाबतीतही हे चित्र दिसून येतं. आता त्याबद्दल अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरने तिचं मत मांडलं आहे.
केतकीला घरातूनच संगीताचा वारसा लाभला आहे. तिची आई सुवर्णा माटेगावकर या प्रसिद्ध गायिका आहेत. तर केतकीही लहानपणीपासून विविध कार्यक्रमांमध्ये गायन करते. केतकीही लहान असताना ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे रिअॅलिटी शोमध्ये कसं वातावरण असतं याचा तिला अनुभव आहे. पण आता पालकांचा या कार्यक्रमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यावर केतकीने भाष्य केलं आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, “कार्यक्रमांमध्ये मिळणारं यश हे अंतिम नाही. यशाची व्याख्या सतत बदलत असते. म्हणजे ग्रॅमी पुरस्कार मिळाला तरी आणखी काही तरी मिळवायची इच्छा असतेच. यशाची भावना ही आतून येत असते असं मला वाटतं. आपल्याला जिथे वाटतं की हे आपलं यश आहे, तेच आपलं यश. रिअॅलिटी शोजकडे स्पर्धा म्हणूनच पाहिलं पाहिजे. मुलांना गाण्याचा निखळ आनंद घ्यायची संधी द्यायची सोडून आता तुला टॉप टेन आणि टॉप फाइव्हमध्ये यायचंय अशी सक्ती करण्यात काही अर्थ नाही. रिअॅलिटी शोमध्ये आपल्या मुलाने किंवा मुलीने जावं म्हणून त्यांना गाणं शिकवणं हे तर चुकीचं आहे. तर मुलांचं लहानपण जपलं पाहिजे.”