अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता हृषिकेश शेलार यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका दोन वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. त्यातील अधिपती व अक्षरा या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मास्तरीणबाई आणि अधिपती यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. त्यांच्यासह अभिनेत्री कविता लाड साकारत असलेल्या भुवनेश्वरी या पात्रानंदेखील प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. या मालिकेला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
अशातच ‘झी मराठी’ वाहिनीनं आंबा महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला वाहिनीवरच्या विविध मालिकांतील कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यासाठी अधिपती-अक्षरा ही जोडीदेखील उपस्थित होती. यादरम्यान त्या दोघांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये अक्षराला “तुम्ही आंब्यापासून कधी कुठला पदार्थ बनवला आहे का”, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अक्षरा म्हणजेच शिवानी रांगोळे उत्तर देत म्हणाली, “हो. मी लग्नानंतर माझ्या सासरी आंब्याची आमटी बनवली होती आणि हा प्रयोग मी माझ्या आजेसासूबाईंवर केला होता. खरं तर त्या खूप उत्तम जेवण बनवतात; पण मी एका नवीन लग्न झालेल्या सुनेसारखी यूट्यूबवर बघून ती आमटी बनवली होती. तेव्हा ती आंब्याची आमटी छान झाली होती. पण, माझ्या घरी कोणाला फार आंबे आवडत नाहीत. फक्त मी आणि माझे सासरेच खातो.”
शिवानी दोन वर्षांपासून अक्षरा ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचीही चांगलीच पसंती मिळाली आहे. पण, अशातच आता ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेनंतर आता ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिकासुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. छोट्या पडद्यावरील दोन प्रसिद्ध मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्यामुळे मालिकेच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान, शिवानी रांगोळेच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिनं आजवर ‘अशा आम्ही दोघी,’ ‘सांग तू आहेस का, ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर,’ ‘बन मस्का’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ‘ती तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत काम करीत असून, तिची ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे शिवानी यानंतर कोणत्या नवीन भूमिकेत झळकणार हे पाहणं रंजक ठरेल.