Snehlata Vasaikar on New Role: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ अशा मराठी व हिंदी मालिका, चित्रपट यामधून अभिनेत्री स्नेहलता वसईकरने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अभिनेत्रीच्या ऐतिहासिक भूमिकांना प्रेक्षकांकडून मोठे कौतुक झाले.
आता अभिनेत्री सन मराठी वाहिनीवरील नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुझ्यासाठी तुझ्यासंगं असे या मालिकेचे नाव आहे. अभिनेत्री या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. माईसाहेब, असे तिच्या भूमिकेचे नाव आहे. आता अभिनेत्रीने या मालिकेतील तिच्या भूमिकेबाबत भावना व्यक्त केल्या आहेत.
“यापूर्वी मी स्वतःशी ठरवलं होतं…”
मराठी सारियल्स ऑफिशियलशी बोलताना अभिनेत्री स्नेहलता वसईकर म्हणाली, “तुझ्यासाठी तुझ्यासंगं या नव्या मालिकेत मी माईसाहेब ही खलनायिकेची भूमिका साकारतेय. माईसाहेब ही मुलावर नितांत प्रेम करणारी, राजकारणातील डावपेच खेळणारी, कर्तबगार, गावाची तारणहार आहे.
“या भूमिकेमध्ये अशा बऱ्याच छटा आहेत. माझ्या वयापेक्षा जास्त वय असलेली ही भूमिका आहे. यापूर्वी मी स्वतःशी ठरवलं होतं की, आपल्या वयापेक्षा मोठी व्यक्तिरेखा आपण साकारायची नाही. वयापेक्षा मोठं पात्र साकारताना तारेवरची कसरत असते. कायम अलर्ट राहावं लागत. पण मी माईसाहेब या पात्राच्या प्रेमात पडले आणि मला नेहमीच आव्हानात्मक भूमिका साकारायला आवडतात. मालिकेचे दिग्दर्शक विनोद लवेकर यांनी जेव्हा मला या भूमिकेबद्दल सांगितलं, त्या क्षणी मी भूमिकेसाठी तयार झाले.”
पुढे अभिनेत्री म्हणाली, “या भूमिकेचा लूक खूप खास आहे. मला या नव्या लूकमध्ये प्रेक्षक ओळखूच शकत नाही. नाशिकमध्ये या मालिकेचं शूटिंग सुरू आहे. याआधी मुंबईत शूटिंग करत असताना घराकडे लक्ष देता यायचं; पण आता मुंबई-नाशिक असा प्रवास सुरू झाला आहे.”
“माझी मुलगी शौर्या आता १२ वर्षांची आहे. जेव्हा मी या नव्या भूमिकेविषयी तिच्याशी बोलले, तेव्हा तिने मला खूपच सकारात्मक ऊर्जा दिली. ती म्हणाली की, तुला खूप छान भूमिका साकारायला मिळत आहे. तू नक्की कर. मला तुला माईसाहेब भूमिकेत बघायचं आहे. तिच्या आणि माझ्या नवऱ्याच्या पाठिंब्यामुळेच मी ही भूमिका आनंदानं आणि मनापासून करत आहे”, असे म्हणत अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही मालिका १४ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.