टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रीच्या घटस्फोटाची बातमी समोर आली आहे. ‘कसौटी जिंदगी की २’ मधील भूमिकेसाठी ओळखली जाणारी टेलिव्हिजन अभिनेत्री सोन्या अयोध्या (Actress Sonyaa Ayoddhya Divorce) पतीपासून विभक्त झाली आहे. पाच वर्षांच्या संसारानंतर सोन्याने पती हर्ष समोर्रेपासून अधिकृतपणे घटस्फोट घेतला आहे.

२९ वर्षांची सोन्या अयोध्या हिने घटस्फोटाची घोषणा अद्याप केलेली नाही. पण टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एप्रिल २०२५ मध्ये तिच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली.

सान्या व हर्ष यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं, तेव्हापासूनच या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांबरोबरचे जे फोटो पोस्ट केले होते, तेही हटवले. त्यानंतर मात्र यांच्यात सगळं आलबेल नसून दोघेही घटस्फोटाच्या तयारीत असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. सान्या घटस्फोटाचा उल्लेख न करता क्रिप्टिक पोस्ट शेअर करत होती, त्यावरून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं.

एका पोस्टमध्ये तिने लिहिलेलं, “कोणीतरी मला विचारलं, ‘तू तुझी बाजू सांगणार नाहीस का?’ मी उत्तर दिलं, ‘माझी बाजू देवाला माहिती आहे आणि ते पुरेसं आहे.” सान्या व हर्ष आता एकत्र कुठेच दिसत नाही. फोटोही हटवले आहेत.

थाटामाटात केलं होतं लग्न

सोन्या आणि हर्ष यांचे लग्न १२ डिसेंबर २०१९ रोजी जयपूरमध्ये एका भव्य सोहळ्यात झाले होते. सान्याने म्हटलं होतं की इतक्या थाटामाटात लग्न करणं ही तिच्या कुटुंबाची इच्छा होती. दरम्यान, नंतर दोघांमध्ये सगळं आलबेल होतं, पण ऑक्टोबर २०२४ पासून या दोघांच्या सोशल मीडिया वावरावरून त्यांच्या नात्यात आलबेल नसल्याच्या चर्चा होऊ लागल्या आणि आता त्यांचा घटस्फोट झाला आहे, असे वृत्त समोर आले आहे.

सोन्या सध्या कामावर लक्ष केंद्रित करतेय. नुकतीच ती एका ओटीटी शोमध्ये झळकली होती. सोन्या ‘शक्ती: अस्तित्व के एहसास की’, ‘नजर’ आणि ‘संजोग’ सारख्या मालिकांमध्ये केलेलया कामासाठी ओळखली जाते. सोन्याने आपल्या दमदार अभिनयामुळे टीव्हीवर स्वतःचं भक्कम स्थान तयार केलं आहे. आता जरी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणतेही अधिकृत विधान केले नसले तरी तिच्या कृतींवर तिच्या आयुष्यात चढ-उतार आल्याचं दिसतंय.