‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नव्याने सुरू होणाऱ्या ‘नशीबवान’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेता आदिनाथ कोठारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये नेहा नाईक, अजय पूरकर, सोनाली खरे अशा दिग्गज कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही मालिका येत्या १५ सप्टेंबरपासून रात्री ९ वाजता प्रसारित केली जाणार आहे. आदिनाथने त्याच्या नव्या मालिकेबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. तो यामध्ये रुद्रप्रताप घोरपडे ही भूमिका साकारणार आहे.

आदिनाथ कोठारेसाठी ‘रुद्रपताप घोरपडे’ ही भूमिका ड्रीमरोल आहे. या भूमिकेविषयी सांगताना आदिनाथ म्हणाला, “या मालिकेसाठी मी प्रचंड उत्सुक आहे. माझी पहिली दैनंदिन मालिका आहे. गेली अनेक वर्षे मालिका करण्याचा विचार सुरु होता. नशिबाने ‘नशीबवान’ मालिकेच्या निमित्ताने हा योग जुळून आला. टीव्ही हे फक्त माझंच नाहीतर प्रत्येकाचं आवडतं माध्यम आहे. मालिकेच्या माध्यमातून तुम्ही घराघरांत पोहोचता, प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग होता. ‘नशीबवान’ मालिकेची गोष्ट अतिशय सुंदररित्या गुंफण्यात आली आहे. रुद्रप्रताप या भूमिकेला देखील अनेक पदर आहेत. जे हळुहळू प्रेक्षकांसमोर उलगडतील.”

आदिनाथ कोठारे पुढे सांगतो, “चित्रपट, ओटीटी माध्यमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणं आणि आता रोज प्रेक्षकांना आपण भेटणार ही भावना खरंच कमाल आहे. यापूर्वी अनेक मालिकांची निर्मिती केल्याने आधीच मी पडद्यामागची बाजू अनुभवली आहे पण, आता अभिनेता म्हणून दुसरी बाजू अनुभवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. माझ्या नशिबाने दिलेली ही एक ‘नशीबवान’ संधी आहे असं म्हणायला हरकत नाही”

“स्टार प्रवाह वाहिनीबरोबर खूप जुनं नातं आहे. निर्माता म्हणून कोठारे व्हिजनची पहिली मालिका स्टार प्रवाहसह केली होती. त्यानंतर अनेक सुपरहिट मालिका वाहिनी आणि आमच्या प्रोडक्शन हाऊसने एकत्र केल्या. पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्टची सुरुवात महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसह होतेय याचा अतिशय आनंद आहे. मालिकेत दिग्गज कलाकारांची फौज आहे. गणेशोत्सवाच्या धामधुमीत अतिशय छान कलाकृती माझ्या वाट्याला आली आहे. मला खात्री आहे बाप्पाच्या आशीर्वादाने नशीबवान मालिका देखील प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल.” असं आदिनाथ कोठारेने सांगितलं.