Actor Exit From Aai Ani Baba Retire Hot Aahet: काही मालिका अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. मालिकेतील पात्रे प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. अशा मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत‘ ही मालिका प्रदर्शित होते. मालिकेतील किल्लेदार कुटुंब प्रेक्षकांचे मनोरंजन करते. मध्यमवर्गीय कुटुंबातील यशवंत व शुभा किल्लेदार हे घराचे प्रमुख आहेत. यशवंत हे नोकरीतून निवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांना निवांत आयुष्य जगायचे होते. मात्र, ते घराच्या जबाबदारीमध्ये अडकल्याचे दिसते.

यशवंत यांची पत्नी शुभा ही संपूर्ण घराला बांधून ठेवते. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. घरातील काही जण स्वार्थी वृत्तीने वागतात; तर काही आई वडिलांवर प्रेम करीत असल्याचे दिसते. समीर हा त्यांचा मोठा मुलगा आई-वडिलांचा आदर करतो. त्यांच्या शब्दाचा मान ठेवतो; तर त्याची पत्नी सीमाला वेगळे घर हवे आहे आणि त्यासाठी ती सातत्याने प्रयत्न करते.

त्यांचा लहान मुलगा मकरंद स्वत:चा विचार करतो. त्यामुळे काही वेळा त्याच्या आजुबाजूचे लोक दुखावतात. त्याची पत्नी स्वीटी मात्र तिच्या सासू-सासऱ्यांना म्हणजे यशवंत व शुभाला आदर देते. त्यांच्यावर प्रेम करते. शुभा व यशवंत उतारवयातही घराची जबाबदारी पेलताना दिसतात. घरावर येणाऱ्या संकटांना सामोरे जाताना दिसतात.

‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट

आता मात्र ही मालिका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मालिकेत शुभा व यशवंत यांच्या लहान मुलाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने ही मालिका सोडली आहे. या मालिकेत मकरंद किल्लेदार ही भूमिका अभिनेता आदिश वैद्यने साकारल्याचे पाहायला मिळाले. आता त्याने ही मालिका सोडल्याचे वृत्त त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून समोर आले आहे.

अभिनेता आदिश वैद्यने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत या ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका सोडत असल्याचे लिहिले. त्याने लिहिले, “या भूमिकेचा निरोप घेत आहे. त्याची कारणं मला चांगलीच माहीत आहेत. पुढे जाताना खूप आशा आणि सकारात्मकतेनं जातोय. माझ्या भूमिकेला दिलेल्या प्रेमाबद्दल खूप आभार.”

मालिका सोडल्यासंबंधित आदिशने आणखी एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्याने लिहिले होते की, या भूमिकेसह मी माझ्या प्रत्येक भूमिकेसाठी खूप कष्ट केले. पण, माझ्या स्वत:च्या प्रगतीसाठी मी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामाणिकपणे सांगायचं, तर मला माझ्या भूमिकेची खूप आठवण येईल. काही प्रेमळ कलाकार, सेटवरील लोकांची आणि आमच्या सेटवरीला श्वान ‘काळू’ची खूप आठवण येईल.

या मालिकेतील भूमिकेसाठी माझा विचार केला त्याबद्दल मी ‘स्टार प्रवाह’चा आभारी आहे. माझा स्वाभिमान सांभाळून मी कठोर परिश्रम करीत राहीन. लवकरच, काही नवीन प्रकल्पांमधून भेटीला येईल. मी म्हणत असतो की, तू चाल पुढं तू रे गड्या भीती कशाची. भेटूयात लवकरच, अशी पोस्ट त्याने शेअर केली होती. आता ही पोस्ट डिलीट झाल्याचे दिसत आहे. त्याबरोबरच त्याने इतर सगळ्या गोष्टींपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा, अशी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.

दरम्यान, आदिश वैद्य मराठी, तसेच हिंदी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिकांत दिसला होता. तो ‘बिग बॉस मराठी ३’च्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. आता आगामी काळात तो कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.