Aishwarya & Avinash Narkar : मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणून ऐश्वर्या व अविनाश नारकर यांना ओळखलं जातं. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून या जोडप्याने प्रेक्षकांच्या मनावर गेली वर्षानुवर्षे अधिराज्य गाजवलं आहे.

‘नारकर कपल’ इन्स्टाग्रामवरील रील्स व्हिडीओमुळे सर्वाधिक चर्चेत असतं. ऐश्वर्या व अविनाश सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या भन्नाट गाण्यांवर नेहमीच डान्स व्हिडीओ बनवतात. सध्या त्यांच्या अशाच एका राजस्थानी गाण्यावरच्या जबरदस्त डान्स व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सोशल मीडियावर सर्वत्र संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याची हवा निर्माण झालेली असतानाच गेल्या महिन्यात आणखी एक सुंदर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं, या गाण्याचं नाव आहे ‘पल्लो लटके’. हे राजस्थानी गाणं सर्वत्र तुफान ट्रेंड होत आहे. ‘पल्लो लटके’ गाणं निझामी ब्रदर्स आणि वनिता पांडे यांनी गायलं असून त्यांनीच या गाण्यात काम देखील केलेलं आहे. राजस्थानी लोकगीताला पॉप संगीताची जोड देऊन एका आगळ्यावेगळ्या शैलीत हे गाणं संगीतबद्ध करण्यात आलं आहे.

सध्या सोशल मीडियावर वनिता पांडेचं हे ‘पल्लो लटके’ गाणं खूपच लोकप्रिय ठरलं आहे. अवघ्या महिन्याभरात या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या व अविनाश नारकरांना देखील या गाण्याची भुरळ पडली आहे. वनिताच्या ‘पल्लो लटके’ गाण्यावर नारकर कपलने जबरदस्त डान्स केला आहे. हा डान्स करताना ऐश्वर्या यांनी लेव्हेंडर रंगाची सुंदर प्युअर सिल्क महेश्वरी साडी नेसली होती. तर, अविनाश नारकर देखील हटके लूकमध्ये पाहायला मिळाले.

ऐश्वर्या यांनी या व्हिडीओला ‘पल्लो विथ माय पल्लू’ असं कॅप्शन दिलं आहे. रील व्हिडीओमध्ये या दोघांची डान्स एनर्जी पाहून सगळेच थक्क झाले आहेत. नारकर जोडप्याच्या डान्स व्हिडीओवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. दोघांचाही “सुंदर डान्स”, “वॉव मस्त”, “सॉरी ऐश्वर्या मॅम पण, यावेळी अविनाश सरांनी आमचं लक्ष वेधून घेतलं”, “कोणी काहीच बोलू नका…अविनाश सर व ऐश्वर्या मॅडम एकदम जबरदस्त परफॉर्मन्स” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून या व्हिडीओवर आल्या आहेत. सर्वांनी या जोडप्याचं भरभरून कौतुक केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अविनाश नारकरांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ते ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत आणि ‘पुरुष’ या नाटकात काम करत आहे. तर, ऐश्वर्या नारकर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेनंतर नव्या कोणत्या प्रोजेक्टमध्ये झळकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.