Aishwarya & Avinash Narkar Dance Video : मनोरंजन विश्वातील ‘आदर्श जोडी’ म्हणून ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्याकडे पाहिलं जातं. प्रेक्षकांची ही लाडकी जोडी सध्या व्हिएतनाम येथे फिरायला गेली आहे. व्हिएतनाम ट्रिपदरम्यानचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ सध्या नारकर कपल सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

ऐश्वर्या व अविनाश नारकर विविध ट्रेंडिंग गाण्यांवर रील्स व्हिडीओ बनवत असतात. आता या जोडप्याने व्हिएतनामच्या समुद्रकिनारी संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे.

‘गुलाबी साडी’ या गाण्यामुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या संजू राठोडने गेल्या महिन्यात त्याचं ‘शेकी’ गाणं लॉन्च केलं. या गाण्याला सध्या नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याच्या हूकस्टेप्सवर सामान्य लोकांपासून ते बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच ठेका धरल्याचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. या गाण्यात संजूबरोबर ‘बिग बॉस’चं हिंदी पर्व गाजवणारी अभिनेत्री ईशा मालवीय झळकली आहे.

संजूच्या या नव्या गाण्याची भुरळ आता नारकर जोडप्याला देखील पडली आहे. दोघांनी व्हिएतनामच्या समुद्रकिनारी ‘एक नंबर, तुझी कंबर’ म्हणत ‘शेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. यादरम्यान ऐश्वर्या व अविनाश नारकरांच्या स्टायलिश लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

ऐश्वर्या यांनी ‘शेकी’ गाण्यावर डान्स करताना काळ्या रंगाचा स्लीव्हलेस वनपीस तर, अविनाश नारकरांनी पांढऱ्या रंगाचं स्वेटशर्ट घालत नेहमीपेक्षा काहीसा हटके आणि स्टायलिश लूक केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

नेटकऱ्यांनी नारकर जोडप्याच्या या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अवघ्या एक तासात त्यांच्या या व्हिडीओला १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या अविनाश नारकर ‘स्टार प्रवाह’च्या ‘लग्नानंतर होईल प्रेम’ या मालिकेत पार्थ-जीवाच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. याशिवाय ऐश्वर्या नारकरांच्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आता त्या कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून भेटीला येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.