Aishwarya & Avinash Narkar New Project : मराठी नाटकांचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही वर्षांत नाटकांच्या माध्यमांतून रंगभूमीवर अनेक नवनवीन विषय सादर करण्यात आले आहेत. प्रिया बापट-उमेश कामत, सखी गोखले-सुव्रत जोशी, प्रसाद खांडेकर-नम्रता संभेराव या कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेल्या नाटकांना सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय. अशातच आता मालिकाविश्वातील लाडकी जोडी रंगभूमीवर एन्ट्री घेण्यासाठी सज्ज होत आहे. त्यांच्या नाटकाचं पहिलं पोस्टर नुकतंच लॉन्च करण्यात आलं आहे.
ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्याकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. या दोघांनी अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये एकत्र काम केलेलं आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत हे दोघंही टेलिव्हिजनवर सक्रिय होते. अविनाश नारकर सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ आणि ‘तारिणी’ या दोन लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. तर, ऐश्वर्या नारकर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका संपल्यावर कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर अभिनेत्रीने नव्या नाटकाचं पोस्टर शेअर करत आज सर्व चाहत्यांना रंगभूमीवर कमबॅक करत असल्याची आनंदाची बातमी दिली आहे.
ऐश्वर्या व अविनाश यांच्या नव्या नाटकाचं नाव आहे ‘शेवग्याच्या शेंगा’. गजेंद्र अहिरे या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक आणि गीतकार आहेत. तर, दीप्ती जोशी या नाटकाच्या निर्मात्या आहेत. ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २७ सप्टेंबरला पुण्यात पार पडणार आहे. २७ सप्टेंबरला एकाच दिवशी ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकाचे दोन प्रयोग सादर केले जातील.
ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘शेवग्याच्या शेंगा’ नाटकात लोकप्रिय अभिनेत्री नंदिता पाटकर सुद्धा झळकणार आहे. नंदिताने ‘एलिझाबेथ एकादशी’ या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. याशिवाय ‘स्टार प्रवाह’च्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत सुद्धा ती झळकली होती.
‘आई कुठे काय करते’ फेम लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा गोरे सुद्धा या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसेल. अंकिता दिप्ती आणि साकार देसाई हे नवोदित कलाकार देखील ‘शेवग्याच्या शेंगा’मध्ये झळकतील.
नाटकाचं पहिलं पोस्टर समोर येताच नेटकऱ्यांनी संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आशुतोष गोखले, मधुराणी प्रभूलकर, शुभंकर एकबोटे, सीमा घोगळे, अश्विनी कासार, चेतर गुरव, सुरुची अडारकर, तितीक्षा तावडे, ऋजुता देशमुख या सगळ्याच कलाकारांनी शुभारंभाच्या प्रयोगासाठी संपूर्ण टीमला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.