‘बिग बॉस मराठी’ या शोमुळे अनेक कलाकारांना प्रसिद्धी व लोकप्रियता मिळाली, यापैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेता अक्षय केळकर. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा तो विजेता ठरला होता. या शोमुळे अक्षयच्या प्रसिद्धीत चांगलीच वाढ झाली. अक्षयने आपल्या अभिनयाबरोबर उत्तम निवेदनाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात अक्षयची विनोदी शैलीदेखील पाहायला मिळाली.

आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा अक्षय गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली होती. याबद्दची प्रत्येक अपडेट्स अक्षय सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर करत होता. अशातच आता त्याचा विवाहसोहळा पार पडला आहे. आज ९ मे रोजी अक्षयने गर्लफ्रेंड ‘रमा’ म्हणजेच साधना काकटकरबरोबर लग्नबंधनात अडकला आहे.

अक्षय व साधना यांच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे. अक्षयची ‘बिग बॉस’मधील खास मैत्रीण आणि अभिनेत्री अमृता धोंगडेने तिच्या सोशल मीडियावर अक्षय-साधना यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला. तिने शेअर केलेला हा फोटो साधना-अक्षय यांच्या रिसेप्शन सोहळ्यातील असल्याचं दिसत आहे. हा खास फोटो शेअर करत तिने या नवविवाहित दाम्पत्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता धोंगडे इन्स्टाग्राम स्टोरी
अमृता धोंगडे इन्स्टाग्राम स्टोरी

अक्षयने रिसेप्शनसाठी काळ्या रंगाचा सूट, तर साधनाने लाल रंगाची साडी परिधान केली असल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. अक्षय आणि साधना यांचा हळदी सोहळा काल (०८ मे) रोजी पार पडला. या हळदी सोहळ्यासाठी मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार अक्षयच्या घरी पोहोचले होते. प्रथमेश परब, समृद्धी केळकरसारख्या लोकप्रिय कलाकारांनी त्यांच्या मेहंदी सोहळ्यात धमाल केली. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले.

अक्षय साधनाला प्रेमाने ‘रमा’ असं म्हणतो. त्यामुळेच या लग्नसोहळ्यादरम्यान अभिनेत्याने ‘रमाक्षय’ हा विशेष हॅशटॅग तयार केला आहे. मेहंदीसाठी त्याने हातावरही ‘रमाक्षय’ असं लिहिलं होतं. दरम्यान, गेल्यावर्षी २३ डिसेंबरला अक्षयने गर्लफ्रेंड रमाचा चेहरा सर्वांसमोर आणला होता. नात्याला १० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्याने एक गोड व्हिडीओ शेअर करत होणाऱ्या बायकोची ओळख सर्वांना करून दिली होती.

अक्षयच्या बायकोचं पूर्ण नाव साधना काकटकर असं आहे. ती गायिका, गीतकार आहे. अक्षय केळकर व समृद्धी केळकरच्या ‘नाखवा’, ‘मैतरा’ गाण्यांसाठी साधनाने काम केलं होतं. दरम्यान, दहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अक्षय आणि साधना यांनी आता त्यांच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली आहे.