Ali Goni Gets Trolled : अली गोनी व जास्मिन भसीन हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. दोघांनी आजवर विविध मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकपसंती मिळवली. परंतु, सध्या हे जोडपं एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आलं आहे. गणपतीच्या आरतीदरम्यानचा दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अली गोनी व जास्मिन भसीन नुकतेच गणेश उत्सवानिमित्त इंडस्ट्रीतील मित्राच्या घरी गेले होते, त्यादरम्यानचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये एका घरात आरती सुरू असून त्यावेळी अली गोनी, जास्मिन भसीन आणि निया शर्मा हे कलाकार उपस्थित असल्याचं दिसतं.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये निया व जास्मिन बाप्पाची आरती सुरू असताना भक्तीपूर्ण वातावरणात मग्न झालेल्या असतात, तर तिथेच अली उभा असतो व तोही ते पाहत असतो. त्यादरम्यान जास्मिन त्याला आरतीमध्ये त्यांच्याबरोबर सहभागी व्हायला सांगते असं पाहायला मिळतं. परंतु, अली गणपती बाप्पा मोरया असं म्हणताना दिसत नाही. यावरून आता या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट करत त्याच्यावर टीका केली आहे.

सोशल मीडियावरील व्हिडीओखाली एकाने इतकं “अनकम्फर्टेबल वाटत होतं तर मग आलासच का जास्मिन, तू विचार करायला पाहिजे होता”, “याच्यापेक्षा चांगला तर सोनाक्षीचा नवरा आहे”, “कन्व्हर्ट तुला व्हावं लागेल त्याला नाही” अशा कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत.

जास्मिन व अली यांच्या सोशल मीडियावरील व्हिडीओखालील कमेंट्स

अलीने यादरम्यानचे काही फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत. त्याने जास्मिन व इतर कलाकार मित्रांबरोबरचे फोटो शेअर करत त्याला फॅमिली अशी कॅप्शन दिली आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये जास्मिन, भारती सिंह, निया शर्मा, विकी जैन यांसारखे इतरही काही कलाकार पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, जास्मिन व अली यांच्याबद्दल बोलायचं झालं तर दोघे ‘बिग बॉस १४’मध्ये झळकले होते. तिथेच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघेही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कपल असून जास्मिनने त्यांच्या नात्याबद्दल, ते जसे आहेत तसा त्यांनी एकमेकांचा स्वीकार केला असून त्यांना याबाबत इतरांची मतं महत्त्वाची वाटत नसल्याचं म्हटलं होतं.