लोकप्रिय बॉलीवूड गायक व संगीतकार अमाल मलिक सध्या बिग बॉस 19 मध्ये दिसतोय. यशस्वी संगीतकार असलेला अमाल या शोमधील लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. बिग बॉससाठी लाखो रुपये मानधन घेणाऱ्या अमालने तो एका शोमधून किती पैसे कमावतो, याबद्दल खुलासा केला होता.
अमालने फक्त पैसे कमावण्याबद्दल नाही, तर खर्चाबद्दलही सांगितलं होतं. अमालने स्वतःला उदार म्हणत दिवसाला लाख रुपये खर्च करत असल्याचं म्हटलं होतं. रोजच्या जेवणाचं बिल हजारो रुपयांचं असतं, असंही त्याने नमूद केलं.
जेवणाचं बिल २० हजार…
अमाल शाळेत असल्यापासून अकाउंट्समध्ये हुशार होता. तो आता लाखो रुपये कमवत असला तरी त्याची खर्चाची पद्धत त्याच्या आईला आवडत नाही. “माझे जेवणाचे बिल २० हजार का आहे किंवा मी अचानक एकाच दिवसात एक लाख रुपये का खर्च केले, हे आईला कधीच समजणार नाही. कारण माझ्या आईचं पैशांशी खूप वेगळं नातं आहे. मी पैसे कुठे खर्च करतो, त्याची माहिती वडिलांना देतो, पण आईला सांगत नाही, कारण ती माझ्या खर्चांमुळे नाराज असते,” असं अमाल मलिक सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
पैसे साठवून ठेवावे वाटत नाही – अमाल मलिक
अमालची पैशांबद्दलची मानसिकता आईपेक्षा खूप वेगळी आहे. खास निमित्त असेल तर तो मनसोक्त पैसे खर्च करतो. “कधीकधी एखाद्या इव्हेंटनंतर मी पार्टी करतो, किंवा माझ्या टीममधील लोकांना बाहेर नेतो, त्यावेळी मी खूप पैसे खर्च करतो. मी खूप उदार व्यक्ती आहे. पैसे साठवून ठेवावे, असं मला वाटत नाही. पैसे कमावले आहेत तर ते खर्च करायला हवे,” असं अमालने नमूद केलं. आईने खूप हलाखीचे दिवस पाहिलेत, त्यामुळे तिचा पैशांबद्दलचा दृष्टिकोन वेगळा आहे, असंही अमालने सांगितलं.
अमाल इंडस्ट्रीत खूप काम करतोय, त्यामुळे कधीकधी कामाचे पैसे मिळाले नाही तर तो त्याची पर्वा करत नाही. पैशांची पर्वा नसल्याने अनेक मोठे पेमेंट्स सोडून दिले. बरेच बडे निर्माते वचन देऊनही पैसे बुडवतात, असं त्याने सांगितलं. “बरेच असे मोठे निर्माते आहेत जे तुमच्या पेमेंटच्या ४०% पैसे देत नाहीत, पण बजेट नसलेले लहान निर्माते मात्र पूर्ण पैसे देतात. मी अशा लहान निर्मात्यांबरोबरही काम करतो. इंडस्ट्रीत माझी जवळपास २५ लाख रुपयांची थकबाकी आहे, पण मला त्याचा काहीच फरक पडत नाही. देवाची कृपा आहे, मी २५ लाख रुपये एका रात्रीत आणि एका परफॉर्मन्समध्ये कमवतो,” असं अमाल म्हणाला.