Ankita Lokhande Talks About Pregnancy : अंकिता लोखंडे हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. ती अनेकदा कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच ती गणेश चतुर्थीनिमित्त एका कार्यक्रमाला उपस्थित होती. त्यादरम्यान तिला गरोदरपणाबद्दल विचारण्यात आलेलं, ज्यामुळे अभिनेत्री संतापली आणि तिनं त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली.
अंकिता व तिचा नवरा विकी जैन अनेकदा कुठल्या न कुठल्या कारणांमुळे चर्चेत असतात. दोघेही अनेकदा मित्रांच्या पार्टीमध्ये किंवा कौटुंबिक कार्यक्रमात हजेरी लावताना दिसतात. अशातच दोघे गणेश चतुर्थीनिमित्त एका कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी अंकिताला गरोदरपणाबद्दल विचारण्यात आलं होतं, ज्यामुळे ती संतापली आणि याबद्दलची स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त करीत असा प्रश्न पुन्हा विचारू नका, असं तिनं सांगितलं.
अंकिता लोखंडेची गरोदरपणाबद्दल प्रतिक्रिया
‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार गणेश चतुर्थीनिमित्तच्या कार्यक्रमादरम्यान अंकिता व विकी माध्यमांशी संवाद साधत असताना तिला याबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर अंकिता म्हणाली, “मी खरंच सांगते, मला हा प्रश्न फार बोअरिंग वाटतो. मला असं काही विचारू नका. ज्या दिवशी होईल तेव्हा मी स्वत: सांगेन. मला या गोष्टीबद्दल सतत बोलायला आवडत नाही. प्रेग्नन्सी वगैरे… खूप जास्त होतं हे सगळं आणि मग मला पालक बनण्याचं दडपण येतं.”
अंकिता लोखंडे व विकी जैन यांनी डिसेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधलेली. अंकिता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे; तर विकी जैन हा एक उद्योगपती आहे. ती खऱ्या अर्थानं प्रसिद्धीझोतात आली ते ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे. त्यासह तिनं काही बॉलीवूड चित्रपटांतही काम केलं आहे. अंकिता व विकी हे दोघेही ‘बिग बॉस’च्या सीझन १७ मध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर ते ‘लाफ्टर शेफ’ या कार्यक्रमातही झळकले होते.
‘लाफ्टर शेफ’दरम्यान अंकितानं ती गरोदर असल्याचं म्हटलं होतं. ‘लाफ्टर शेफ’मध्ये टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कलाकार झळकले होते. त्या कार्यक्रमाच्या एका एपिसोडदरम्यान, कार्यक्रमाचा होस्ट कृष्ण अभिषेक जेव्हा अंकिताकडून एक वस्तू हिसकावून धावतो तेव्हा ती त्याला मला जास्त धावायला लावू नकोस. मी गरोदर आहे, असं म्हणताना दिसते. त्यानंतर अभिनेत्रीच्या गरोदरपणासंबंधित चर्चा सुरू झाल्या.
उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार, विकी जैननं नंतर एका मुलाखतीत अंकिताच्या गरोदरपणाबद्दल प्रतिक्रिया देत असं काहीही नसल्याचं म्हटलं होतं. तो म्हणालेला, “चर्चा तर खूप सुरू आहे. जेव्हा हा विषय निघतो तेव्हा आमचं संपूर्ण कटुंब यासाठी आमच्याकडे आग्रह धरतं.” यावेळी अंकिता म्हणालेली, “चर्चा सुरू आहे. मला या प्रश्नाचा कंटाळा आला आहे.”