Ankita Walawalkar Trip : अंकिता वालावलकर ‘बिग बॉस मराठी’ शोमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. तिला तिचे चाहते ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून देखील ओळखतात. अंकिताने यंदा फेब्रुवारी महिन्यात लोकप्रिय मराठी संगीतकार कुणाल भगतशी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटी तसेच अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स देखील उपस्थित होते. आता अंकिता व कुणाल त्यांच्या पहिल्या इंटरनॅशनल टूरवर गेले आहेत. याची खास झलक ‘कोकण हार्टेड गर्ल’ने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
अंकिता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. “आम्हा दोघांची एकत्र पहिली इंटरनॅशनल ट्रिप आणि बऱ्याच गोष्टींची सुरुवात…”, असं कॅप्शन देत अंकिताने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पासपोर्ट, विमान प्रवास तसेच ज्या देशात जाणार त्याचा नकाशा या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत.
याशिवाय अंकिताने एक मिनी ट्रॅव्हल व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. या व्हिडीओला ‘कोकण हार्टेड गर्ल’ने ‘युरोप कॉलिंग’ असं कॅप्शन दिलं आहे. यावरून अंकिता व कुणाल पुढचे काही दिवस युरोपमध्ये भ्रमंती करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता म्हणते, “मला एक तासांचा विमान प्रवास करणं जमत नाही, इथे तर मला ६-७ तासांचा प्रवास करून जायचंय.”
आता अंकिता व कुणाल युरोपातील लक्झेंबर्ग या देशात फिरणार आहेत. ‘कोकण हार्टेड गर्ल’च्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी ‘हॅप्पी जर्नी’ म्हणत कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
पुढच्या काही दिवसांत अंकिता-कुणाल युरोपातील कोणकोणते देश फिरणार, तिच्या व्हिडीओमधून कोणत्या नव्या जागांची झलक पाहायला मिळणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, अंकिताचा नवरा कुणाल भगतबद्दल सांगायचं झालं, तर मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय संगीतकार म्हणून कुणालला ओळखलं जातं. ‘येक नंबर’ या सिनेमासाठी कुणालने संगीत दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकांना देखील त्याने संगीत दिलं आहे.