Ankita Walawalkar Sends Gifts To Dhananjay Powar : गेल्यावर्षी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अंकिताने डीपीला राखी बांधली होती. अशातच आजच्या रक्षाबंधननिमित्तही अंकिताने डीपीसाठी खास भेटवस्तू पाठवली आहे. अंकिता सध्या भारतात नसल्याने यंदा ती डीपीला राखी बांधू शकत नाहीय; पण असं असलं तरी अंकिताने डीपीसाठी रक्षाबंधनचं खास गिफ्ट पाठवलं आहे.

तसंच या गिफ्टबरोबर एक भावुक पत्रही पाठवलं आहे. याचा व्हिडीओ डीपीने त्याच्या युट्युब चॅनेलवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला डीपी अंकिताने दिलेलं गिफ्ट उघडतो, त्यात त्याच्यासाठी काही शर्ट असतात. यानंतर त्याला अंकिताने लिहिलेलं पत्र मिळतं. या पत्रातून तिने तिच्या डीपीदादांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पुढे डीपी अंकिताने लिहिलेलं हे पत्र वाचतात. तिच्या या पत्रात असं लिहिलेलं आहे की, “प्रिय डीपीदादा, गेल्या वर्षी ‘बिग बॉस’च्या घरात मी फक्त तुम्हाला राखी बांधली होती. ते दिवस आठवले की, अंगावर काटा येतो. काय करावं ते कळत नव्हतं तेव्हा आपणच एकमेकांचा आधार बनलो. यावर्षी तुमची बहीण काही पूर्वनियोजित कामामुळे रक्षाबंधनच्या दिवशी भारतात नाही. परंतू आपलं नातं साजरं झालंच पाहिजे. डीपी स्टाईल काही शर्ट तुम्हाला पाठवत आहे. आवडले तर रक्षाबंधनच्या दिवशी नक्की घाला.”

यापुढे अंकिताने पत्रात असं लिहिलंय, “माझ्या नावाची राखी ताईंकडून बांधून घ्या. मला काही गिफ्ट नको. पण खरीच गरज असेल तेव्हा हक्काने हाक मारेन. तेव्हा पाठीशी उभे राहा. मला गेल्यावर्षी जो आधार दिला तो मी कधीही विसरणार नाही. अबोला असेल तरीही नाही. तुम्हाला माहीतच आहे मी जास्त रागावत नाही. आपला भाऊ चुकू नये; म्हणून तुम्हाला ऐकवते, पण त्यामागे उद्देश हाच असतो की, चुका कमी कराव्यात. त्यासाठी मला तुमच्या बाबांबबरोबर बसावं लागेल. रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं वादळ.”

धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर

यापुढे डीपी म्हणतो, “खूप खूप धन्यवाद. मी तुला गिफ्ट देणारच होतो. पण आता योगायोगाने तू भारतात नाही आणि भारताबाहेर जायची माझी ऐपत नाही. नाहीतर बालीला येऊन तुला गिफ्ट देणार होतो; पण तू काहीच नको बोललीस त्यामुळे मी हताश आहे. पण तू भारतात परत येशील तेव्हा तुझ्या आवडीचं जे हवं आहे ते तुला देईन. असंच तुझं माझ्यावर प्रेम राहुदे. पुन्हा खूप खूप धन्यवाद.”