Anupamaa Fame Gaurav Khanna Reacts To Being Highest Paid Contestant On Bigg Boss 19 : ‘बिग बॉस १९’ची काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा सुरू होती. अशातच नुकताच २४ ऑगस्ट रोजी त्याचा प्रीमियर प्रदर्शित झाला. १६ स्पर्धकांची ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री झाली असून, त्यामध्ये टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कलाकार ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर या सर्वांचा समावेश आहे. त्यामध्ये ‘अनुपमा’ फेम अभिनेता गौरव खन्नाचाही समावेश आहे. अशातच तो यंदाच्या सीझनमधील सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक असल्याचे म्हटले जात आहे.
‘बिग बॉस’च्या घरामध्ये जाण्यापूर्वी गौरवने ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली होती. यावेळी त्याने याबद्दल सांगितले होते. तो म्हणालेला की, ही अफवा असू शकते किंवा नाहीसुद्धा. कारण-याबद्दल अनेक जण वेगवेगळ्या चर्चा करत आहेत. ‘बिग बॉस’मधील मानधनाबद्दल गौरव म्हणाला, “मी कधीच कोणत्या कलाकाराला किती पैसे मिळत आहेत यावरून त्याच्याशी कसं वागायचं हे ठरवत नाही. मला तर नेमके स्पर्धक कोण असणार आहेत याचीसुद्धा माहिती नाहीये.”
गौरव त्याबद्दल म्हणाला, “आमच्यामध्ये पैशांबद्दल चर्चा होत नाही. त्यामुळे लोकांना जे हवं ते बोलू शकतात. माझं ध्येय फक्त एवढंच आहे की, मला या सीझनमध्ये चांगली कामगिरी करायची आहे.” त्यासह त्याने त्याला अभिनय क्षेत्रात कामाची फार संधी मिळत नसल्याने रिअॅलिटी शो करण्याचा निर्णय घेतला अशा चर्चांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ‘बिग बॉस’पूर्वी तो ‘मास्टर शेफ इंडिया’मध्ये सहभागी झाला होता.
गौरव याबद्दल म्हणाला, “यानंतर माझ्या वाट्याला खूप चांगल्या भूमिका येतील हे तुम्ही बघालच. तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण, खरंच बिग बॉससाठी मी काही मालिकांना नकार दिला आणि मला वाटतं की, एवढं स्पष्टीकरण पुरेसं आहे.”
दरम्यान, गौरव खन्नाने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. अलीकडे तो चर्चेत आला ते ‘अनुपमा’ मालिकेतील त्याच्या भूमिकेमुळे. त्यामध्ये त्याने ‘अनुपमा’च्या दसुऱ्या पतीची अनुज कपाडियाची भूमिका साकारली होती. या मालिकेतून निरोप घेतल्यानंतर तो ‘मास्टर शेफ इंडिया’मध्ये झळकला. आता अभिनेता ‘बिग बॉस’च्या १९ व्या सीझनमध्ये सहभागी झाला आहे.