Apurva Nemlekar Shares Emotional Post For Brother : लोकप्रिय मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनं आजवर आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अनेक मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते. अशातच तिने दिवंगत भावासाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे.
‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेतून अपूर्वाने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. या मालिकेतील तिची शेवंता ही भूमिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर ती स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत तिची भूमिका नकारात्मक असली, तरी या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.
आपल्या अभिनयानं चर्चेत राहणारी अपूर्वा सोशल मीडियावरही सक्रिय असते. अशातच दिवंगत भावाच्या आठवणीत अपूर्वाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे आणि आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या पोस्टमध्ये अपूर्वा म्हणते, “ओमी, तुला जाऊन दोन वर्ष झाली… पण असा एकही दिवस नाही, ज्या दिवशी तुझी आठवण येत नाही. १९९४ पासून तुझा वाढदिवस एकत्र साजरा करणं आपण कधीच चुकवलं नाही आणि आज तू इथे नसला तरी मी तुझा वाढदिवस माझ्या मनात, आठवणीत आजही साजरा करत आहे. तुझं हसणं अजूनही माझ्या स्मरणात आहे. तुझं प्रेम शांत क्षणी माझ्या मनाला कायमच जाणवत राहतं.”
यापुढे अपूर्वा भावूक होत असं म्हणते, “तू गेल्यानंतर आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नाही. पण, तरीही तुझ्या प्रेमाची आणि मायेची ऊब माझ्या आजूबाजूला असल्याचं जाणवत राहतं आणि हे शब्दांत सांगणं शक्य नाही. तू जिथे कुठे असशील, तिथे शांत आणि समाधानात असावंस. तुझ्या निरागस हास्याने तिथलं जगसुद्धा आनंदी राहावं, हीच प्रार्थना.”
यापुढे अपूर्वाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “तू कायमच माझा लाडका भाऊ राहशील… माझा अभिमान असशील… आणि माझ्या आत्म्याचा एक असा भाग राहशील, जो वेळ कधीच हिरावून घेऊ शकणार नाही. तुझ्यावरचं माझं प्रेम कधीच कमी होणार नाही. तुझी खूप आठवण येतेय, तुझीच अप्पू.” अपूर्वाच्या या पोस्टखाली तिच्या काही चाहत्यांनी भावाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
अपूर्वा नेमळेकर इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेनंतर अपूर्वा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्टार प्रवाहवरील ‘शुभविवाह’ या मालिकेतून अपूर्वा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. या मालिकेत ती एसीपी अपूर्वा पुरोहित हे पात्र साकारणार आहे आणि पहिल्यांदाच ती पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.