Rasika Vakharkar Talks About Marriage : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या ‘अशोक मा.मा.’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका वाखरकर हिने काही दिवसांपूर्वी साखरपुडा केला. त्यासंबंधित फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तिने तिच्या चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली. अशातच आता तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगितलं आहे.
रसिका ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘अशोक मा.मा.’ मालिकेपूर्वी ती ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘प्रितीचा वणवा उरी पेटला’ या मालिकेत मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकलेली. सध्या ती अभिनेते अशोक सराफ यांच्या मालिकेत भैरवी ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
रसिकाने काही दिवसांपूर्वी ७ सप्टेंबर रोजी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करत त्यांचा साखरपुडा झाल्याची आनंदाची बातमी दिली होती. रसिकाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शुभंकर उमराणी असं असून त्यांचं अरेंज मॅरेज सेटअपमध्ये सगळं ठरल्याचं तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
रसिकाने नुकतीच ‘अल्ट्रा मराठी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल, सासरच्या मंडळींबद्दल तसेच तिचं लग्न कसं जुळलं याबद्दल सांगितलं आहे. रसिकाला यामध्ये तिचं लग्न कसं जुळलं याबद्दल विचारण्यात आलं. यावर ती म्हणाली, “हे सगळं अनपेक्षित होतं आणि खूप पटापट सगळं घडलं. आम्ही कुटुंब आधी एकमेकांना भेटलो. त्या आधी थोडं आमचं बोलणं सुरू होतं, पण सगळं जुळत गेलं आणि दोन महिने फक्त मध्ये गेले, त्यात आम्ही एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आता तर आमचा साखरपुडाही झाला आहे.”
रसिका वाखरकरची होणाऱ्या नवऱ्याबद्दल प्रतिक्रिया
रसिका पुढे होणाऱ्या नवऱ्याकडून तिच्या काय अपेक्षा होत्या याबद्दल बोलली आहे. ती म्हणाली, “माझ्यासाठी पहिली महत्त्वाची गोष्ट ही होती की, मी ज्या क्षेत्रात काम करतेय त्याला समजून घेणारा, त्याचा आदर करणारा आणि फक्त माझा जोडीदारच नाही तर त्याच्या कुटुंबीयांनीही याबद्दल समजून घ्यावं, त्यांना याबद्दल थोडीशी आवड असावी हेच माझं आणि माझ्या कुटुंबाचं मत होतं; कारण या क्षेत्रासाठी त्यांनी मला खूप पाठिंबा दिला आहे. अशा जोडीदारच्या मी शोधात होते.”
रसिका वाखरकरचा होणारा नवरा ‘या’ क्षेत्रात करतो काम
रसिका तिचा जोडीदार कोणत्या क्षेत्रात काम करतो याबद्दल सांगत म्हणाली, “त्याचा या क्षेत्राशी काहीही संबंध नाहीये. तेच मला हवं होतं. माझी अशी इच्छा होती की या क्षेत्रातला जोडीदार नको. शुभंकरचा कौटुंबिक व्यवसाय आहे. तो मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीत काम करतो आणि या क्षेत्राबद्दल त्याला कुतूहल आहे.” सासू-सासऱ्यांबद्दल रसिका म्हणाली, “त्यांनी माझं काम पाहिलं आहे. त्यांना माझ्या कामाबद्दल खूप कौतुक असतं, ते मला याबद्दल विचारत असतात, ते खूप हौशी आहेत; त्यांना नाटक, सिनेमे बघायला आवडतात.”
साखरपुड्याबद्दल रसिका म्हणाली, “साखरपुड्याचा कार्यक्रम खूप छान झाला. माझी सगळी जवळची लोकं आली होती आणि आमच्या आयुष्यातील तो खूप महत्त्वाचा दिवस होता. तो दिवसच अविस्मर्णीय होता. साखरपुडा झाल्यानंतर सेटवरील लोकांनाही तेव्हाच कळलं की शुभंकर कोण आहे, काय करतो. सेटवर सगळ्यांनी केक, गिफ्ट आणले आणि छोटसं सेलिब्रेशन झालं आणि तो सेटवर आला होता.”
अशोक सराफ यांनी दिलेला ‘हा’ सल्ला
रसिकाला याबद्दल अशोक सराफ यांची काय प्रतिक्रिया होती, त्यांनी काय आशीर्वाद दिला असं विचारल्यानतंर ती म्हणाली, “त्यांना या गोष्टीचं खूपच कौतुक वाटलं. माझा साखरपुडा ठरला तेव्हा मी सेटवर पहिल्यांदा त्यांना सांगितलेलं. तेव्हा त्यांनी पहिली गोष्ट मला हीच सांगितलेली की, काम करणार आहेस ना? काम नाही सोडायचं आणि त्यांची खूप इच्छा आहे की मी या क्षेत्रात काम करत राहावं. सगळ्यांकडे नसते ही कला, तुझ्याकडे आहे तर ते सोडू नकोस असं ते म्हणालेले; तो क्षण माझ्यासाठी खूप भावुक होता.”
लग्नाबद्दल रसिका पुढे म्हणाली, “आता साखरपुडा झाला आहे, सगळं खूप लवकर लवकर घडलं, आताच मी कामाला पुन्हा सुरुवात केली आहे, त्यामुळे मला असं वाटतं, मधे थोडासा वेळ गेला की लवकरच लग्नही होईल. अजून लग्नाची तारीख ठरलेली नाहीये.”