छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आज अनेकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही अनेक शिवभक्तांकडून मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरी केली जाते. पण ही शिवजयंती नाचून साजरी करावी की वाचून साजरी करावी यात अनेकांची मतमतांतरे आहेत. अनेक शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाचून साजरी करतात.

तर अनेक शिवभक्त महाराजांची जयंती त्यांची पुस्तकं वाचून आणि त्यांचे विचार आत्मसात करून साजरी करण्याला प्राधान्य देतात. अशातच शिवजयंती नेमकी कशी साजरी केली जावई याबद्दल मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेने तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठी मनोरंजन विश्व या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आश्विनीने शिवजयंती साजरी करण्याबद्दल तिचं मत व्यक्त केलं.

याबद्दल अश्विनी असं म्हणाली, “शिवजयंतीला जो शिवज्योत पेटवून गडावरून त्याच्या गावापर्यंत आणत असेल, तर त्यासाठी खूप शक्ती आणि ताकद लागते. हा विचार करून जो पूर्ण तयारी करून घराबाहेर निघत असेल तर त्याने एक टक्का तिथेच जिंकलं आहे. ही गोष्ट बाजूला ठेवली तर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे डीजे आणि त्यावर नाचणं. खरंतर यांना महाराज कळलेच नाहीत.”

यापुढे अश्विनी म्हणाली, “बऱ्याच अशा सामाजिक संस्था आहेत; ज्या शिवजयंतीला इतर लोकांना मदत करायला जास्त प्राधान्य देतात. त्यापेक्षा जास्तीने गुणाकार केला तर इतकी माणसं आहेत, जे डीजे वर नाचतात आणि शिवजयंती साजरी करतात. पण हे मी इथे बसून सांगितलं की, बाळांनो असं करायचं नाही तर ते काय माझं ऐकणार नाहीत. पण मला वाटतं शिवजयंती साजरी करायला आपण तेव्हाच लायक होऊ, जेव्हा महाराजांचे विचार आत्मसात होतील.”

यानंतर अश्विनी असं म्हणाली, “मी असं नाही म्हणत की, एक पुस्तक वाचा आणि त्यातले हजारो विचार आत्मसात करा. तर ते नाही होऊ शकत. महाराजांचे सोपे आणि साधे विचार आहेत, जे आपल्याला सर्वसाधारणपणे शिकवले गेले आहेत. परस्त्रीचा मातेसमान, बहिणीसमान आदर केला पाहिजे ही छोटीशी गोष्ट आहे पण ती शिकणं गरजेचं आहे आणि ते आपल्यात असायलाच पाहिजे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर तिने सांगितलं, “मी रीलवर एक व्हिडीओ पाहिला, ज्यात लहान मुले डीजेवर नाचत होते आणि अश्लील हावभाव करत होते. जर इथूनच सुरुवात होत असेल; तर मग आपण त्यांना कसं सांगणार की तुम्ही महाराज वाचा. त्यांना सांगण्याआधी त्यांच्या आई-वडिलांना सांगणं गरजेचं आहे.” दरम्यान, अश्विनीचा नुकताच धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.