Avinash Narkar on trolling: कलाकारांचे ज्या प्रमाणात कौतुक होते, तितक्याच प्रमाणात त्यांना अनेकदा टीकेला सामोरे जावे लागते. सोशल मीडियावरही त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
अशा ट्रोलिंगला काही कलाकार सडेतोड उत्तर देतात; तर काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात. आता याबाबत अभिनेते अविनाश नारकर यांनी वक्तव्य केले आहे. अविनाश नारकर हे सोशल मीडियावरील रील्समधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.
अभिनेते अविनाश नारकर ट्रोलिंगबाबत काय म्हणाले?
नुकतीच अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांनी ‘द अनुरूप शो’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “आता ट्रोलिंग खूप कमी झालं आहे. मी प्रत्येक वेळेला सडेतोड उत्तर दिलंच आहे. सडेतोड उत्तरापेक्षाही मला असं वाटतं की, तुम्ही जे समजता, तसं नाहीये, हे मला लोकांना सांगणं गरजेचं वाटतं.
तुम्हाला हे करून पैसा मिळतो म्हणून तुम्ही काहीही करता, हा मुद्दाच चुकीचा आहे. कारण- इन्स्टाग्रामवर रील्स करून पैसा मिळत नाही. हा तुमचा गैरसमज आहे. हा तुम्ही सुधारला पाहिजे किंवा तुम्ही माहीत करून घ्या. असंही म्हटलं जायचं की तुमच्याकडे काम नाही म्हणून तुम्ही रील्स करता, डान्स करता, हा मुद्दा नाही. आम्ही काय काम करतो, हे तुम्ही समजून घ्या. त्यासाठी मी लोकांना उत्तरं द्यायला लागले. आता ते ट्रोलिंग कमी झालं आहे.
अविनाश नारकरांना खूप ट्रोल केलं गेलं, असं म्हणत ऐश्वर्या नारकर पुढे म्हणाल्या, “ज्या पद्धतीने तो एक्स्प्रेस करून डान्स करायचा. त्यावर लोक त्याला ट्रोल करायचे. माझं म्हणणं आहे की, त्या माणसाची मजा करण्याची ती पद्धत आहे. त्याला खूप मजा येते.”
अविनाश नारकर पुढे म्हणाले, “प्रत्येकामध्ये एक जोकर असतो. मला असं वाटतं की, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्याचा प्रयत्न तर केला पाहिजे. जर मला स्वत:ला वेडवाकडं नाचावंसं वाटत असेल, तर मी वेडवाकडं नाचणार. मग लोक म्हणतात की, ते जगासमोर कशाला? तर मला त्यांना विचारावसं वाटतं की काय समस्या आहे? मी कसा वेडावाकडा नाचतो, हे माझ्याबरोबरीनं मला १० लोकांनी सांगणं, यामध्ये मला आनंद आहे. त्यातले चार म्हणतात की, मूर्खासारख काहीतरी करू नको, अशी मला टपली मारली. तरी ठीक आहे.
“एक तर माझ्या अतृप्त इच्छा होत्या. मी लहानपणी खूप आगाऊ होतो. त्यातून माझ्यातील अभिनेत्याची वहिवाट सुरू झाली आहे, असं वाटतं. माझे वडील मला शिक्षा म्हणून मला दुकानाच्या खड्ड्यात बसवायचे. तर दुकानात आलेले गिऱ्हाईक माझ्याबद्दल बोलायचे. मी त्यांच्या नकला करायचो. त्या गोष्टी मी बघून शिकलो आहे. तर तिकडे माझं खरं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे. मी रेकॉर्ड डान्स करायचो. माझ्या आईला ते आवडायचं नाही. एक मुलगा होता, ज्याला हेलन म्हणायचे आणि मला बिंदू म्हणायचे. आम्ही कुठेही डान्स करायचो. त्यासाठी घरी आल्यावर मारदेखील खायचो.
पुढे अभिनेते म्हणाले, “मला असं वाटतं की, आपल्याला जे आवडेल, जे भावेल ते आपण करायचं. बोलणाऱ्यांना जे बोलायचं आहे, ते बोलू दे. त्यांच्याबरोबरीनं काही लोकं असतात, जी कौतुक करणारी असतात.”
दरम्यान, अभिनेते अविनाश नारकर सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काम करताना दिसत आहेत. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.